Deepak Kesarkar : एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. राज्याच्या राजकारणात अजूनही या राजकीय नाट्याची चर्चा होतच असते. तसेच भाजप आणि शिवसेना युती का तुटली याचेही असंख्य किस्से सांगितले जातात. आताही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी युती तुटण्याला आदित्य ठाकरेच जबाबदार असल्याची टीका केली आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) येत्या 9 आणि 10 जानेवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर (Kolhapur) असून हातकणंगले मतदारसंघात सभा घेणार आहेत. यावरूनच केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मंत्री केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरेंना सगळीकडे दौरे करू द्या. भाजपा आणि शिवसेना युती तुटण्यात खरंतर आदित्य ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. बाळासाहेबांच्या विचारापासूननही ते दूर गेले आहेत. आता आदित्य ठाकरे काँग्रेसचे काय विचार मांडतात ते ऐकायला मिळेल, असा खोचक टोला केसरकरांनी लगावला.
निवडणुकीच्या जागावाटपावरही त्यांनी भाष्य केलं. जागावाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. पण, जिथे आमच्या पक्षाचे खासदार आहेत त्या जागा आम्ही लढवणार हे सूत्र आहे. त्याचं पालन होईल. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघ शिवसेनेचा आहे. तेव्हा तिथे शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढणार आहे, असे केसरकरांनी स्पष्ट केले आहे. केसरकर यांनी या जागा शिंदे गटाकडे असतील असे संकेत दिले असले तरी अजून जागावाटप झालेलं नाही. त्यामुळे जागावाटपात या जागा कुणाच्या वाट्याला जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.