श्रीगोंदा : मागील तीन वर्षे राज्यात विरोधी पक्षांचे सरकार असल्याने विकासकाम करताना अडचणी येत होत्या, मात्र आता केंद्रात आणि राजकीय दोन्हीकडे भाजप प्रणित सरकार असल्याने विकासकामे मार्गी लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. असे प्रतिपादन खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी केले आहे.
मागील तीन महिन्यांत श्रीगोंद्यातील ५० कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया झाली आहे. येत्या काळात अधिक गतीने विकासकामे मार्गी लावून विकास काय असतो ते दाखवून देऊ, अशा शब्दात खासदार डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
श्रीगोंदा तालुक्यात भाजप तर्फे पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी ते बोलत होते खासदार विखे म्हणाले, मतदार संघातील लोकांचे विखे कुटुंबावर खूप मोठे प्रेम आहे. हे प्रेम लोकसंपर्कामुळे नाहीतर विकास कामामुळे आहे.
लोकांनी निवडणुकीत विकासकामे करण्यासाठी निवडून दिले आहे. लोकसंपर्कावर नव्हे तर विकासकामांवर भर देतो लोकसंपर्कावर भर देणारा लोकप्रतिनिधी विकास करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
विक्रमसिंह पाचपुते म्हणाले, मागील नऊ वर्षे संकटांचा ससेमिरा मागे लागल्याने अडचणी वाढल्या. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. प्रतापसिंह पाचपुते, भगवान पाचपुते, दत्तात्रय पानसरे, बापू गोरे, संग्राम घोडके, संदीप नागवडे आदी उपस्थित होते.