अहमदनगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज अहमदनगरमध्ये (Ahmednagar) येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा प्रचार केला. तर उमेदवारीच्या घोळावरून तांबे पिता-पुत्रांवर (Satyajit Tambe) पटोले यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. तसेच तांबे पिता-पुत्रांनी उमेदवारीवरून केलेल्या घोळाबद्दल पटोले म्हणाले, हा कोणाच्या परिवाराचा संबंध नाही. वडील आणि मुलगा अर्ज भरायला सोबत होते. वडिलांनी अर्ज भरायचा नाही, मुलाने भरला. हे कशासाठी? बाप-लेकात काय चाललंय ते आम्हाला कसं कळणार. कौटुंबिक वादाचा दोष पक्षाला देऊ नका, असा टोलाही पटोले यांनी लगावला आहे.
भाजपने अद्यापही सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहिर केलेला नाही, या प्रश्नावर बोलताना पटोले म्हणाले, आमची भाजपविरोधात लढाई आहे. त्यामुळे भाजप कोणाला पाठिंबा देणार आहे. याच्याशी आमचा संबंध नाही. आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नगरमध्ये आलो आहेत.
सत्यजित तांबे उमेदवारी अर्ज भरणार आहेत हे काँग्रेस नेत्यांना माहिती होते का? या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले, शेवटच्या दिवसापर्यंत कोणालाही काही माहिती नव्हते. कॉंग्रेस कोणा एका कुटुंबाचा पक्ष नाही. अनेक गोष्टी गुलदस्त्यात आहेत. पाचही विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असे पटोले म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा असल्याचे पत्र पंतप्रधानांना पाठवले आहे यावर बोलताना पटोले म्हणाले, भाजपला महापुरुषांचा अन्याय करायचा आहे. राज्यपाल राजीनामा देण्याची नौटंकी करतं आहेत. आम्ही महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही.
प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत का? यावर नाना पटोले म्हणाले, महाविकास आघाडीची दोन तारखेला बैठक आहे. वंचित बहुजन आघाडीबाबत व आगामी निवडणुकांबाबत निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.