Nandani Math, Kolhapur elephant Mahadevi:
कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जातोय. या महामार्गाला जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्याविरोधात आंदोलनं होतायत. त्यात आता नांदणी मठातील हत्तीण गुजरातला पाठवायचा मुद्दा गाजतोय. हत्तीणीला गुजरातमधील अंबानींच्या वनतारा या खासगी अभयारण्यात पाठवण्याला मठाचा आणि स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. थेट हायकोर्ट अन् सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलंय… यात अंबानींना ही हत्तीण कशाला हवीय? नांदणी मठात हत्तीणीला काय धार्मिक महत्त्व आहे? हेच आपण या व्हिडिओतून पाहूया…
नांदणी मठ जैन समाजासाठी का महत्त्वाचा?
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावात नांदणी मठ आहे. नांदणीत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील जैन समाजाच्या 748 गावांचा हा पुरातन मठ आहे. या मठाचा इतिहास जवळपास बाराशे वर्षांपासूनचा आहे. या मठामध्ये जैन समाजात ज्यांना धर्मगुरूचा मान दिला जातो. ते जिनसेन भट्टारक स्वामी या मठाचे मठाधिपती म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक दशकापासून या मठामध्ये हत्ती सांभाळला जातो. या मठाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या गावांमध्ये ज्यावेळेस पंचकल्याण पूजा होतात, तेव्हा या पुजेतील इंद्र – इंद्रायणींना या हत्तीवरुन भगवंताचा अभिषेक आणि इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा मान आहे.
मठाकडं 1992 पासून महादेवी हत्तीण…
नांदणी मठाकडं 1992 पासून महादेवी नावाची हत्तीण आहे. ही हत्तीण चार वर्षांची असताना मठात आली होती. या हत्तीणींचं वय चाळीस वर्षांचं असल्याचं मठाकडून सांगितलं जातंय. तेव्हापासून ती मठातील अनेक धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेली आहे. मठ आणि आसपासच्या गावांतील ग्रामस्थांचं हत्तीणीशी एक भावनिक नातं तयार झालंय.
वनतारा खासगी अभयारण्याला हवी हत्तीण
रिलायन्स उद्योग समुहाचे मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत यांनी जामनगरमधील वनतारा येथे खासगी अभयारण्य उभारलंय. त्याठिकाणी वन्यप्राणी आहेत. येथे हत्ती पुनवर्सन केंद्र आहे. या केंद्रासाठी प्रशिक्षित हत्ती हवा असल्याचं बोललं जातंय. त्यासाठी केरळमधून एक हत्ती आणला जाणार होता. मात्र केरळनं हत्ती दिला नाही. त्यानंतर वनतारामधील एक टीम ही नांदणी येथील मठात आली होती. त्यांना महादेवी ही हत्तीण हवी होती. त्यासाठी ते मठाला देणगीही देणार होते. त्यात कोणीतरी मध्यस्थी होता. मात्र मठानं हत्तीणीला वनतारा केंद्राला देण्यास नकार दिल्याचं बोललं जातंय.
पेटाची एन्ट्री ते कायदेशीर लढाई
त्यानंतर प्राण्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पेटाची एन्ट्री झालीय. या हत्तीणीची दुरावस्था झाली असून, ती आजारी आहे. त्यामुळं तिला वनतारा अभयारण्यात सोडावं, अशी याचिका पेटाकडून थेट मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली. त्यानंतर कोर्ट हत्तीणींच्या आरोग्य तपासणींसाठी तीन सदस्यांची कमिटी स्थापन करून अहवाल सादर करण्याचा आदेश देते. त्यानुसार तीन पशुवैद्यकीय अधिकारी महादेवीची आरोग्य तपासणी करते आणि कोर्टात अहवाल सादर करते. त्यात हत्तीणीची दुरावस्था झालेली आहे. तिची परिस्थिती चांगली नाही. तिची नखं वाढलेली, पायांना सूज आलेली आहे. साखळ दंडानं बांधल्यामुळं हत्तीणीच्या पोटाला व्रण आहेत, असा अहवाल येतो. मात्र नांदणी मठाला हा अहवाल मान्य नसतो. तेही हत्तीणीची समांतर आरोग्य तपासणी करतात. त्यात हत्तीणीची प्रकृती चांगली असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला जातो. वनविभाग आणि पशुवैद्यकीय विभागाचा हा अहवाल असतो. मात्र वनविभागाकडून नांदणी मठाच्या अहवालाबाबत घुमजाव केला जातो. त्यामुळं कोर्टानं दोन आठवड्यात महादेवीची रवानगी वनतारा हत्ती पुनवर्सन केंद्रात करण्याचा आदेश दिलाय.
जैन मठ आणि स्थानिक ग्रामस्थांकडून कृती समिती
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर जैन मठ आणि स्थानिक ग्रामस्थांनी मिळून एका कृती समितीची स्थापना केलीय. आता ही कृती समिती उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलीय. तर शुक्रवारी कोल्हापूरमध्ये हत्तीणीच्या बचावासाठी आंदोलन करण्यात आलं. ही हत्तीण नांदणी येथे 36 वर्षांपासून आहे. त्यावर कधी कुणी आक्षेप घेतला नाही. अंबानी यांचा वनतारा हा प्रकल्प झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षित हत्ती मिळवून देण्यासाठी प्राणीमित्र संघटना, प्रशासन, अंबानी उद्योग समुहासह अनेक राज्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पैसा आणि संपत्तीसमोर न्यायव्यवस्थेला हाताशी धरून समाजाची शेकडो वर्षांची संस्कृती आणि परंपरा मोडण्याचं कटकारस्थान केलं जात असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. नांदणी मठामधील हत्तीण ही अनेक वर्षांपासून आहे. तोपर्यंत कुणाची तक्रार नव्हती. हत्तीणीची दुरावस्था झाल्याचं म्हणतायत तर तीला दुसऱ्या पुनवर्सन केंद्रात न्या. तिला वनतारा अभयारण्यात नेण्याचा घाट का घातला जातोय? असा सवाल मठाचा आहे.