Download App

Sharad Pawar: हेलिकॉप्टर चुकीने दुसऱ्याच हेलिपॅडवर उतरले अन…

अहमदनगर : माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांचे चिरंजीव आणि माजी आमदार चंदशेखर घुले (Chandsekhar Ghule) यांच्या कन्येचा विवाह सोहळा (wedding ceremony) रविवारी सोनई येथे संपन्न झाला. यावेळी हेलिपॅडवर गंमतशीर प्रकार घडला. 

मुळा सहकारी साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली खरी मात्र त्यांचे हेलिकॉप्टर चुकीने दुसऱ्याच हेलिपॅडवर उतरले आणि दोन्ही हेलिपॅडवरील प्रशासन व नियोजनातील यंत्रणेची एकच धावपळ उडाली.

सोनई-शिंगणापूर रस्त्यावरील मुलानी माथा येथे तयार केलेल्या हेलिपॅडवर माजी मंत्री विश्वजित कदम यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते, तर मुळा कारखान्याच्या हेलिपॅडवर पवारांचे हेलिकॉप्टर उतरणार होते. पवारांची वाट पाहत मोठा लवाजमा थांबला होता.

येथे सर्व प्रोटोकॉल तैनात असताना पवारांचे हेलिकॉप्टर चुकीने मुलानी माथ्यावर उतरले. तेथे फक्त एक मोटार व दोन सुरक्षा कर्मचारी पाहून झालेली चूक पायलटच्या लक्षात आली.

स्वागत, प्रोटोकॉल व स्थानिक सुरक्षेचा विचार न करता तेथे असलेल्या राजेंद्र गुगळे यांच्या इनोव्हा मोटारीत बसून पवारांनी चालक संपत मरकड यांना विवाहस्थळी घेण्यास सांगितले. प्रोटोकॉलशिवाय अचानक पवार मंडपात आल्याने उपस्थित अचंबित झाले.

पवार साहेबांना घेऊन जाताना छातीची धडधड थांबता थांबली नाही, असे चालक मरकड आपल्या मित्रांना सांगत होते.

सुरक्षा कर्मचारी अशोक राख यांना घेवून पवारांच्या पायलटने हेलिकॉप्टर मुळा कारखान्यावर नेले. पवार साहेब आले म्हणून सर्व यंत्रणा अलर्ट झाली.

उतरलेल्या हेलिकॉप्टरमध्ये पवार दिसत नसल्याने सर्वांची चिंता वाढली होती. सुरक्षा कर्मचारी अशोक राख यांनी घडलेला प्रकार सांगितला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.

Tags

follow us