Download App

‘उजनी’चा उजवा कालवा फुटला, शेकडो एकर शेतीचं मोठं नुकसान

सोलापूर : उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा (Ujani Irrigation Department Right canal) फुटलाय. मोहोळ (Mohol) तालुक्यातील पाटकुल (Patkul) गावातील उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला आहे. हा कालवा फुटल्यानं शेकडो एकर शेतात पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतामधील डाळिंब, उसासह विविध पिकं वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय.

उजनी धरणातून उजव्या कालव्यात 500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरु होता. अचानक पाटकुल गावातील उजवा कालवा फुटल्यानं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिकांचं मोठं नुकसान झालंय. पाटकुल येथील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. उजनी धरणातून येणारा मोठा उजनी उजवा कालवा 112 किलोमीटरचा आहे. रविवारी पहाटे रात्री पाटकुल ओढ्याजवळ हा कालवा फुटला आहे, त्यामुळं शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह विहिरींचं देखील मोठं नुकसान झालंय. शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेलंय.

उजवा कालवा फुटल्यानं काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचंही मोठं नुकसान झालंय. त्या पाण्याच्या प्रवाहात इलेक्ट्रिक मोटारी वाहून गेल्या आहेत. अद्यापही पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरुच आहे. त्यामुळं उभ्या उसातून मातीसह पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यानं ऊस शेतीचंही मोठं नुकसान झालं.

शेकडो एकर शेतात पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांकडून विचारला जातोय. प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Tags

follow us