Download App

Letsupp Special : साताऱ्यात उलथापालथ; उदयनराजे भाजपचे उमेदवार ठरताच, पृथ्वीराज चव्हाण रिंगणात उतरणार

  • Written By: Last Updated:

पुणे : लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांत उमेदवार देण्यासाठी कमालीचे कौशल्य पणाला लागले आहे. त्यातून बऱ्याच राजकीय उलथापालथी होत आहेत. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा लोकसभा निवडणुकीचा लढविण्याचा हट्ट भाजपने मान्य केल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचे गणित पुन्हा बसवले जात आहे. त्याचा परिणाम  महाविकास आघाडीतील समीकरणांवर होत आहे. (Satara Loksabha Constituency Pruthviraj Chavan In After Udayanraje Name Final By BJP )

महायुतीत साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे जाणे अपेक्षित होते. अजित पवार यांनी तशी जाहीर मागणी केली होती. मात्र भाजपसाठी ही जागा सोडावी लागत असल्याने राष्ट्रवादीला नाशिकची जागा देण्याची तयारी करण्यात आली आहे. साताऱ्यात उदयनराजे हे भाजपचे उमेदवार ठरत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने साताऱ्याच्या जागेचा त्याग करण्याची तयारी दाखवली आहे. ही जागा काॅंग्रेसला देऊन तेथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना रिंगणात उतरविण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले. या साऱ्या गदारोळात नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा राजकीय बळी जाणार असल्याचे निश्चित आहे. महायुतीच्या जागावाटपात माळी समाजाचा एकही उमेदवार नसल्याचे लक्षात आल्याने नाशिकमधून मग छगन भुजबळ यांची उमेदवारी नक्की ठरली आहे.

Letsupp Special : नाही मशाल, फक्त विशाल : उद्धव ठाकरेंसाठी सांगली भूंकपाचे केंद्र

साताऱ्यात पवार यांच्या मनात श्रीनिवास पाटील यांचे नाव आधी चर्चेत होते. पण वयोमानामुळे पाटील यांनी आपला मुलगा सारंग याच्या नावाचा आग्रह धरला होता. पण तगडी लढत देण्यास सारंग कितपत यशस्वी होतील, याची खात्री अद्याप पक्षाला नाही. कऱ्हाडचे आमदार बाळासाहेब पाटील यांचेही नाव चर्चेत सुरू होते. शशिकांत शिंदे यांचीही उदयनाराजे यांच्याशी सामना करण्याची तयारी होती. पण त्याऐवजी वेगळीच चर्चा आता सुरू झाली आहे. साताऱ्याच्या बदल्यात भिवंडीची जागा राष्ट्रवादीला देण्याची चर्चा महाविकास आघाडीत सुरू आहे.  त्यामुळे काॅंग्रेसमधून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव यात आघाडीवर आहे.

उदयनराजे यांची उमेदवार निश्चित असल्याचे मानत त्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन सुरू केले. उमेदवारीसाठी उदयनराजे हे गेले चार दिवस दिल्लीत होते. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून त्यांनी उमेदवारीचे आश्वासन मिळवले. हे आश्वासन मिळवून उदयनराजे यांची सातारा जिल्ह्यात जोरदार एंट्री झाली. शिरवळपासूनच मोठी रॅली काढण्यात आली. त्यामुळे उदयनराजे यांची उमेदवारी भाजप जाहीर करणार असल्याचे महाविकास आघाडीच्या लक्षात आले. त्यामुळे उदयनराजे यांना तोंड देण्यासाठी सुशिक्षित असा चेहरा म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे आले आहे.

शरद पवारांना मानणारा जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख आहे. राष्ट्रवादीची कऱ्हाड उत्तर आणि कऱ्हाड दक्षिण या दोन्ही मतदारसंघात चांगली ताकद आहे. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात उदयनराजे यांना आघाडी घेणे ही अवघड बाब ठरणार आहे. त्यामुळेच कऱ्हाड दक्षिणचे आमदार असलेल्या चव्हाण यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री असलेले चव्हाण हे १९९९ मध्ये कऱ्हाड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांनी लोकसभेची निवडणूक पुन्हा लढविली नाही. ते आता पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरणार का, हे पुढील काही तासांत अधिकृतरित्या कळेल.

 

follow us