Download App

Satyajeet tambe: प्रचार संपला; नाशिकमध्ये भाजपचा सस्पेन्स तर थोरातांचे मौन

अहमदनगर : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यावर भाजपचा (BJP) अजूनही सस्पेन्स आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (satyajeet tambe) आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यात लढत होत आहे.

भाजपने उमेदवार न दिल्याने अपक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण तो अपक्ष कोण हे अद्याप स्रष्ट झालेलं नाही. आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेवारांनी सभा, मेळावे, गाठीभेटी यावर भर दिलाय.

सोमवारी या जागेसाठी मतदान होणार आहे. पण भाजपचा पाठिंबा कोणाला याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. दरम्यान नाशिक पदवीधर निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत संध्याकाळपर्यंत निर्णय होईल, असे भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी म्हटले होते. तर सत्यजित तांबे यांनी अद्याप पाठिंबाच मागितला नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजप नेमकं कोणाला पाठिंबा देणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.

काँग्रेस नेते आणि सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अद्याप सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीबद्दल भूमिका स्पष्ट केलेली नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा प्रचार करताना देखील थोरात दिसले नाहीत. बाळासाहेब थोरात आजारी असल्याने मुंबईत आहेत, असे कारण देण्यात येत असले तरी नगर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांत दोन गट पडले आहेत.

बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आपण तांबे यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे थोरातांचा आपल्या भाच्याला छुपा पाठिंबा तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Tags

follow us