भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर प्राजक्त तनपुरे पुन्हा चर्चेत; किती आहे त्यांची एकूण संपत्ती?

विधान परिषद निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर सुमारे ८ कोटी 32 लाख रुपयांची एकूण मालमत्ता आहे.

Untitled Design 27

Untitled Design 27

What is the total wealth of Prajakta Tanpure? : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच राहुरीचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे प्रवेश केल्यानंतर लगेचच पक्षाने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात प्राजक्त तनपुरे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

राहुरीच्या राजकारणात तनपुरे कुटुंबाचे नाव गेल्या अनेक दशकांपासून प्रभावी राहिलेले आहे. माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते बापूसाहेब अर्थात प्रसाद तनपुरे यांचा राजकीय वारसा लाभलेल्या प्राजक्त तनपुरे यांनी स्थानिक राजकारणातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. शेती सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील कामांच्या जोरावर त्यांनी जनसंपर्क वाढवला आणि पुढे सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर राहुरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. मंत्री म्हणून त्यांनी नगरविकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या महत्वाच्या विभागांमध्ये काम केले. राज्य मंत्रिमंडळातील तरुण आणि अभ्यासू मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

मात्र राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटात कायम राहिले होते. मात्र अलीकडेच त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने देखील त्यांच्यावर तात्काळ विश्वास दाखवत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे तनपुरे यांच्या नव्या राजकीय इनिंगची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय घडामोडींसोबतच त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील आर्थिक माहिती देखील तितकीच महत्वाची ठरते. प्रतिज्ञापत्रानुसार प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर सुमारे ८ कोटी 32 लाख रुपयांची एकूण मालमत्ता आहे. यात जंगम आणि स्थावर अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्तांचा समावेश आहे.

अर्ज मागे घ्या, भविष्याची जबाबदारी आमची; बंडखोर उमेदवारांना महायुतीची ऑफर, रवींद्र चव्हाणांचे मोठे वक्तव्य

जंगम मालमत्तेचा विचार केला असता, प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर सुमारे 3 कोटी 23 लाख 87  हजार 568 रुपयांचिया जंगम मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये बँक ठेवी, रोख रक्कम, विविध गुंतवणुका, शेअर्स, विमा पॉलीसी, वाहने आणि इतर आर्थिक साधनांचा समावेश आहे. त्यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांच्या नावावर सुमारे 1 कोटी 73 लाख 35 हजार 325 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

स्थावर मालमत्तेच्या बाबतीत प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर सुमारे 5 कोटी 8 लाख 20 हजार 500 रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. यामध्ये शेती जमीन, बिगरशेती जमीन, निवासी मालमत्ता आणि वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेचा समावेश आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे 43 लाख 26 हजार 450 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

यामुळे तनपुरे कुटुंबाची एकत्रित घोषित मालमत्ता 10 कोटी 48 लाख रुपयांहून अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे राजकीय क्षेत्राबरोबरच आर्थिकदृष्ट्या देखील ते सक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात. मात्र या संपत्तीसोबत काही आर्थिक कर्ज देखील आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर विविध बँका आणि वित्तीय संस्थांचे मिळून सुमारे 1 कोटी 62 लाख 92 हजार 465 रुपयांचे कर्ज आहे. तर त्यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांच्या नावावर सुमारे 48 लाख 98 हजार 543 रुपयांचे कर्ज आहे. म्हणजेच कुटुंबावरील एकूण कर्जाचा आकडा दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

उत्पन्नाच्या बाबतीत पाहिले असता, आयकर विवरणपत्रानुसार प्राजक्त तनपुरे यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 36 लाख 58 हजार रुपये आहे. तर पत्नी सोनाली तनपुरे यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 41 हजार 930 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

एकूण मालमत्ता आणि कर्ज यांचा विचार करता प्राजक्त तनपुरे यांची निव्वळ संपत्ती अंदाजे 6 कोटी 69 लाख रुपयांच्या आसपास असल्याचे दिसून येते. एकीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजपमधेय झालेला त्यांचा प्रवेश, दुसरीकडे भाजपकडून मिळालेली विधान परिषदेची उमेदवारी यामुळे तनपुरे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातील चर्चचा केंद्रबिंदू बनले आहेत.

Exit mobile version