Download App

Ekanath Shinde : ‘साहित्य संमेलनांना राजकारण्यांचं काय काम ?’

वर्धा : ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काय, किंवा इतर ठिकाणी होणारी साहित्यविषय संमेलनं काय, गेली अनेक वर्षं मी त्यांना प्रत्यक्ष हजेरी लावत आलो आहे. आम्ही पडलो राजकारणी. मग अशा संमेलनांना आम्ही गेलो की एक प्रश्न हमखास विचारला जातो की साहित्याच्या व्यासपीठावर राजकारण्यांचं काय काम ?’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. ज्येष्ठ विचारवंत-लेखक न्या.नरेंद्र चपळगावकर यंदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. मावळते अध्यक्ष भारत सासणे यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले,’अशी अनेक संमेलनं आपल्याकडे होत असतात. मराठी साहित्य, संस्कृती, परंपरा यांच्या विकासासाठी ती अत्यावश्यक असतात. त्यानं मराठी साहित्याच्या पोषणाला हातभारच लागत असतो. त्यामुळे ती होणं आवश्यक आहे. महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, असे कितीतरी थोर राजकीय, सामाजिक नेते हे साहित्यिकच होते.’

‘समाजाला दिशा देणारे आणि जगण्याचं बळ देणारे सर्व साहित्यिक हे मुळात सामाजिक नेतेच असतात. सामाजिक तळमळीतूनच त्यांचं साहित्य जन्माला येत असतं आणि सामाजिक तळमळीतूनच राजकीय नेतृत्वही उदयाला येत असतं. त्यामुळे सामाजिक तळमळ हे साहित्यिक आणि राजकारणी अशा दोघांचंही उगमस्थान आहे, असं म्हणता येईल.’

‘साहित्यिकांचं समाजात, लोकांच्या मनात नि आमच्याही मनात एक विशेष स्थान असतं. त्यांनी केलेली पाठराखण ही आमच्या दृष्टीने महत्वाची पावती असते. त्यातून लोकसेवेच्या व्रताला आणखी बळ मिळतं.’

‘ज्यांनी आपला देश बळकावून बसलेल्या ब्रिटिशांना म्हणजेच परकीयांना ‘चले जाव’ असं ठणकावलं आणि स्वकीयांना ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र दिला, त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या वास्तव्यानं पावन झालेल्या या भूमीला मी सर्वप्रथम वंदन करतो. ज्यांच्या वास्तव्यानं समृद्ध, पावन झालेल्या या भूमीत हा सोहळा होतो आहे, ते महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, ही लिहिणारीच थोर माणसं होती. ‘

‘देशभरातील मराठीजन येथे उपस्थित आहेत. राज्यातील कानाकोपऱ्यातील लेखक, कवी, रसिक येथे हजर आहेत. लेखक, कवी हे आपल्या लेखनातून त्या त्या प्रदेशातील सांस्कृतिक, सामाजिक व्यवस्थेचा आरसा दाखवत असतात. तिथल्या मातीचा गंध त्यांच्या लेखनातून येत राहतो.’

Tags

follow us