Download App

मंत्रिमंडळ विस्तार कधी? अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं

पुणे : दिल्लीतील नेत्यांकडून ग्रीन मिळाला की, दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी लगावला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार अद्याप बाकी आहे. पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला असून आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिंदे-फडणवीस(Shinde-Fadnvis) सरकारमधील आमदारांचं लक्ष लागून राहिलंय.

अशातच अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची तोफ डागलीय. अजित पवार म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारबाबतचे अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत.

त्यामुळे जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांकडून ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत सरकारचा मंत्रिमंडळ होणार नाही. जेव्हा त्यांना ग्रीन सिग्नल मिळेल तेव्हाच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा करुन भाजपच्या बड्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीवरुन आता तरी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होईल असं भाकीत राजकीय वर्तुळात सुरु होतं.

मात्र, या बैठकीत राज्यातील साखर कारखान्यांबाबत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सांगण्यात आलं होतं. तर दुसरीकडे भाजप-शिंदे गटाच्या आमदारांकडून आपण मंत्रिपदासाठी इच्छूक असल्याच्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, यावरुनच आता अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला चागंलचं धारेवर धरलं असून त्यांनी थेट दिल्लीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

Tags

follow us