मुंबई : फेब्रुवारी महिना म्हंटले की ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine’s Day) म्हणजेच प्रेमाचा दिवस मात्र यंदा या दिवशी ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केंद्र सरकारला शाब्दिक टोले लगावले आहे. गाईला मिठी मारण्याची केंद्र सरकारची कल्पना आपल्याला फार आवडली. मात्र, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी मिठी मारण्यासाठी गाय कुठून आणायची? केंद्र सरकार गाईची सोय करणार आहे का? असा सवाल आव्हाडांनी विचारला आहे.
जगभरात 14 फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. मात्र केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्यात यावा असे आवाहन केले. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. आता याच प्रकरणावर आमदार आव्हाड यांनी तुफान टोलेबाजी केली आहे.
आव्हाड म्हणाले, 14 फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. गेल्या अनेक वर्षांत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याचं स्वरुप बदलत गेलं आहे. भारतातील स्वरुप तर अजून बदललं. नुकतेच केंद्र सरकारने परिपत्रक काढले, ‘गाईला मिठी मारा असा त्यात उल्लेख करण्यात आला.
मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’ हा कुणी-कुणाला मिठी मारण्याचा दिवस नाही. तो एक प्रेमाचा दिवस आहे. तुमची आईही तुमचं प्रेमाचं प्रतीक असू शकते. प्रेम कुणावर करावं यासाठी काहीही बंधणं नसतात. प्रेम कुणावर करावं? याबाबत काही आचारसंहिता नाहीये.
पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, गाईवर प्रेम करा… गाईवर प्रेम करायला तशी काही हरकत नाही. पण गाय आणायची कुठून? हा प्रश्न आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी हजारोंच्या संख्येनं तरुण-तरुणी बाहेर पडतात. मग त्यांच्यासाठी गाई शोधायच्या कुठे? त्यांना गाय मिळणार कुठे? मग सरकार कुठल्या तरी ठिकाणी गाई उभ्या करणार आहे का?” असे सवाल आव्हाडांनी उपस्थित केले.
गाईला मिठी मारताना अनेक अडचणी आहेत. गाईला पुढून मिठी मारली तर ती शिंग मारणार आणि मागून मिठी मारली तर ती लाथ मारणार… तिचं पोट इतकं मोठं असतं की तिच्या पोटाला मिठीच मारता येणार नाही. त्यामुळे गाईला मिठी कशी मारायची? हे आधी तुम्ही दाखवून द्यावे अशी तुफान टोलेबाजी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.