प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा एक फोटो ट्विट केला. या फोटोनंतर भाजप नेते राऊतांवर तुटून पडले. मात्र, त्यानंतरही राऊतांनी माघार घेतलेली नाही. बावनकुळे हे कुटुंबियांसोबत मकाऊ ट्रीपला गेले होते. या दरम्यानचा एक फोटो राऊतांनी ट्विट केला आहे. (Who gives things against Chandrasekhar Bawankule to the media)
यात बावनकुळे मकाऊमध्ये मकाऊ veneshine या कॅसिनोत जुगार खेळत आहेत, असा दावा या फोटोतून केला. इतकंच नाही तर त्यांनी तिथं तब्बल साडे तीन कोटी रुपये उडवले, असा आरोपही त्यांनी केला. यावर बावनकुळेंनी आणि भाजपच्या नेत्यांनी बराच खुलासा केला. ते तिथे जेवण्यासाठी गेलेले, राऊतांनी चुकीचा फोटो ट्विट केला वगैरे असे खुलासे केले. पण वाद शांत होताना दिसत नाही.
मात्र बावनकुळे यांचे फोटो कुठून आले याविषयी सध्या तर्कवितर्क सुरू आहे. बावनकुळे वादात सापडण्याची या दोन महिन्यातील हा दुसरी घटना आहे. यापूर्वी पत्रकारांना पार्टीला घेऊन जा, असे म्हटल्याने बावनकुळे यांच्याभोवती वादाचे कोंडाळे तयार झाले होते. त्याच्याही आधी पक्षाच्या कार्यकार्त्यांसमोर, कार्यक्रमात केलेल्या जागांच्या वक्तव्यावरुन त्यांना वादाला सामोरे जावे लागले होते. पण गोष्ट बारकाईने बघितल्यास, या सगळ्या वादात एक साम्य आहे.
बावनकुळे यांची वक्तव्ये जाहीर सभेतील नव्हती. भाजपच्या अंतर्गत मुख्य पदाधिकारी बैठकीतील होते. या बैठकीतून हे व्हिडीओ तात्काळ मीडिया जवळ पोहचले होते. तर कॅसिनोतील फोटोंवेळी तर कुटुंबीयच सोबत होते. हे फोटोही तात्काळ संजय राऊतांजवळ पोहचले. हे सर्व पाहता बावनकुळे यांना जवळचे कुणी शत्रू आहेत का? हा प्रश्न विचारला जात आहे.
जेव्हा जेव्हा बावनकुळे यांनी पक्षांतर्गत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी त्यांची काही वक्तव्य आणि फोटो माध्यमांकडे आले आहेत. म्हणजे पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, दिवंगत गिरीश बापट या सारख्या नेत्याच्या वैयक्तिक भेटी असतील. किंवा भाजपचे एकेकाळी नाराज असलेले पदाधिकारी असतील त्यांची भेट घेतल्यानंतर बावनकुळे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसते.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बावनकुळे यांनी राज्यभर दौरे सुरू केले. भाजपचा मीडिया आणि आयटी सेल मध्येही बावनकुळे अधिक लक्ष देवू लागले. भाजपच्या मिशन 2024 ची टीम असेल किंवा राज्य कार्यकारिणी असेल तेथे स्वतःच्या मर्जीतले पण पक्षाच्या हिताच्या पदाधिकारी यांची वर्णी लावली. गेल्या अनेक वर्षात भाजपच्या तळागाळातील काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला राज्य कार्यकारणीत स्थान मिळाले ही भावना संघ परिवार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये होती. जे काम चंद्रकांत पाटील यांना जमले नाही तो पंगा बावनकुळे यांनी घेऊन दाखवला आहे. त्यावेळी पक्षातील अनेक स्पर्धक दुखावले गेले ही वस्तुस्थिती आहे.
त्या पेक्षाही या राज्य कार्यकारिणीच्या नावाना दिल्लीत मान्यता मिळाली हा राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांना एक इशारा होता. त्यातच विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि भाजपच्या सर्व नाराज पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्याचे काम बावनकुळे करत होते. या सर्व घडामोडी होत असताना बावनकुळे यांचा मार्ग सोपा नाही हे जाणवू लागले. झाले तेच. बावनकुळे अडचणीत येऊ लागले आहेत. ही त्यांची पक्षांतर्गत बाब झाली. पण हा मसाला पक्षांतर्गत कोणी पुरवला आहे का? याचा बावनकुळे आणि दिल्लीश्वरांना बारकाईने शोध घ्यावा लागेल हे नक्की.