Download App

कधी इचलकरंजीत, कधी अहमनगरमध्ये तर कधी बुलढाण्यात! गजानन महाराज म्हणून अवतरणारे बाबा नेमके कोण?

बुलढाणा : येथील खामगाव तालुक्यातील सुटाळपुरा परिसरात संत श्री. गजानन महाराज (Saint Shri. Gajanan Maharaj) अवतरल्याची बातमी पसरल्याने कालचा संपूर्ण दिवस खळबळ उडाली होती. या बाबांच्या येण्यामुळे या परिसराला भक्तांच्या गर्दीने अक्षरशः यात्रेचे स्वरुप आले होते. सुटाळपुरा परिसरातील अशोक सातव नावाच्या व्यक्तीच्या घरी हे बाबा अवतरले होते. बघता बघता संपूर्ण पंचक्रोशीत ही माहिती पसरली आणि लोकांनी बाबांच्या दर्शनासाठी हार-फुले, प्रसाद घेऊन गर्दी केली. मात्र हे बाबा म्हणजे भोंदू बाबा असल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि लेखक विनायक होगाडे यांनी केला आहे. (Who is that Baba who introduce to maharashtra as Saint Shri. Gajanan Maharaj)

विनायक होगाडे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरुन या बाबांबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले, बुलढाण्यात गजानन महाराजांसारखा दिसणारा एक व्यक्ती आला असून तिकडे अलोट गर्दी उसळली असल्याची बातमी आहे. तर हाच मनुष्य 2015 मध्ये आमच्या इचलकरंजीतील गजानन महाराज मंदिरात येऊन बसला. मग काय, आमच्या पाहुण्यातल्या एकाने मोठ्या भक्तीभावाने त्याला घरी आणला. हा चांगला चार – पाच दिवस त्यांच्यात राहिला. ऐश केली. लोकांनी त्याची आरती करण्यापासून ते त्याला अंघोळ घालण्यापर्यंत सगळे लाड याने पूर्ण करून घेतले.

MPSC ला मिळाले अध्यक्ष! पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हाती कारभार

मला ही बातमी कळल्यावर मी पाहायला गेलो. महाराज सेम गजानन महाराजासारखे बसलेले. चिलीम ओढणारे. समोर भरपूर खायला ठेवलेलं. फोटो व्हिडिओ करायला पूर्ण बंदी. कुणी काढायचा प्रयत्न केला तर तो ओरडायचा. त्यातही मी चोरून फोटो काढला होता, जो या पोस्टला खाली जोडला आहे. मी अंनिसचा कार्यकर्ता असल्या कारणाने आमच्या शाखेत याबद्दल काय करायचे याची चर्चा केली पण दुसऱ्या दिवशी तो तिथून निघून गेला. काही दिवस गेले आणि पुन्हा अहमदनगरमध्ये हा बाबा असाच अवतरला. अहमदनगर अंनिस कार्यकर्ता कुणाल शिरसाट यांना मी कळवले की हाच बाबा आमच्या इकडे आला होता.

त्यावेळीही तो काही करायच्या आधीच असाच पसार झाला. त्यावेळी पेपरात आमच्या कोट्सची बातमीही झाली होती. आता हाच बाबा पुन्हा बुलढाण्यात येऊन बसला आहे. ही याची मोड्स ओपरेंडी असावी. संबंधित बातमीची लिंक सोबत जोडली आहे. त्यावेळी मी काढलेला फोटोही जोडला आहे. तुम्हीच पाहा. बाबा तोच आहे. फक्त त्याला आणि त्याच्या भक्तांना कामे नाहीयेत. लोक मूर्ख बनवायला बसलेच आहेत. तुम्ही मूर्ख बना, असा संतापही होगाडे यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय हा बाबा केवळ श्रीमंत लोकांच्याच घरी कसा काय प्रगट होतो असा सवाल त्यांनी विचारला आहे.

पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीत खदखद वाढली : अजितदादा गटातील सर्व मंत्री फडणवीसांच्या भेटीला

दरम्यान, महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, संत श्री. गजानन महाराजांची व्यक्तिरेखा साकारणारा हा व्यक्ती लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. या व्यक्तीच्या बँक अकाऊंटवरुन तो लातूर जिल्हा बँकेचा खातेधारक असल्याची दिसून येत आहे. या व्यक्तीचे नाव रामराव शेषराव बिराजदार हे असून तो मुक्काम युग्गी (सावंगी) येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित व्यक्तीला दोन दिवसांपूर्वी शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जवळा बुद्रुक गावातील नागरिकांनीही पकडले होते, असा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. त्यामुळे आता नेमका बाबा आहे तरी कोण? नेमके संत श्री. गजानन महाराजांचे अवतार की कोणी भोंदू बाबा असा सवा विचारला जात आहे.

Tags

follow us