Ekanth Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे. या ऑपरेशनअंतर्गत त्यांनी ठाकरे गटाचे सहा खासदार आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांना पक्षात प्रवेश दिला आहे. तर दुसरीकडे आता आणखी काही आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचा दावा त्यांच्या पक्षाकडून करण्यात येत आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
या बातमीनुसार, नाशिक महानगरपालिकेतील (Nashik Municipal Corporation) ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहे. ठाकरे गटाचे 10 ते 12 नगरसेवक ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडणार असल्याची चर्चा नाशिकमध्ये सुरु आहे. शिंदे सेनेतील वरिष्ठ नेत्यांसोबत या नगरसेवकांची बैठक देखील झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच ठाकरे गटाच्या या नगरसेवकांना प्रभागनिहाय 5 कोटी रुपयांच्या विशेष निधी (Operation Tiger) दिला जाणार असं देखील सांगण्यात येत आहे.
तर दुसरीकडे फक्त नाशिकच नव्हे तर राज्यातील अनेक नेते शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छुक असल्याचा दावा शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. मंत्री उदय सामंत, दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांच्या संपर्कात अनेक पक्षाचे नगरसेवक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे ऑपरेशन नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आकर्षण असल्याचा दावा देखील माध्यमांशी बोलताना अजय बोरस्ते यांनी केला आहे.
