मुंबई : आपण साहित्य संमेलन घेतो, उद्योगाचे वेगवेगळे प्रोग्राम घेतो पण सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी लोकांना एकत्रित येण्याचा योग येत नाही. या लोकांना एकत्रित आणण्यासाठी हे विश्व मराठी संमेलन घेतलं जात आहे.
काही लोकांना सवय असते. तशी या विश्व मराठी संमेलनात देखील उणदुणे काढतील. दिपक केसरकर यांनी जे तुळशीचे रोपटं लावलंय. त्यांचा एक दिवस वटवृक्ष होईल. भविष्यात हे संमेलन एखाद्या स्टेडियममध्ये घ्यावं लागलं, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबईत ‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले,”आम्ही आता इंजिनिअरिंग किंवा इतर शिक्षणदेखील मराठी भाषेतून करणार आहोत. मराठी भाषा ही ज्ञान भाषा करणार आहोत. मराठी नाट्य संस्कृतीची प्रगल्भता इतर कशात पाहता येत नाही. जगातील आयटीमध्ये मराठी माणसाला बोलबाला आहे.
महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात पुढे होता. आता त्याला आणखी पुढे आणण्याचा प्रयत्न येत्या काळात करणार आहे. जगातील प्रत्येक खंडातील लोक या संमेलनात उपस्थित आहेत. मराठी भाषेला समृद्ध करण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावकरांनी केलं. भारतीय भाषा जगवण्यासाठी ज्ञान भाषेत रुपांतर केलं पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखल आहे.
25 मैलावर भाषा बदलते असं लोक म्हणतात पण 25 मैलावर बदलणारी भाषा नसते तर ती बोली असते. आणि प्रत्येक बोलीचा एक गोडवा असतो. वऱ्हाडात गेलं की वऱ्हाडी होते पण ती देखील ऐकण्याची वेगळी मजा असते.
त्याप्रमाणे आपण खानदेशात गेलो की तिथल्या मराठीचा वेगळाच गोडवा आहे. मराठवाडा, कोल्हापूर या परिसरातील देखील मराठी भाषेचा वेगळाच गोडवा आहे, असे फडणवीस म्हणाले.
साडेसातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी आता विश्वात्मके देवे असं वैश्विक गाण पसायदानाच्या रुपातने जगाला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G20 चं अध्यक्षपद मिळालं. त्या अध्यक्षपदाची देखील थीम तीच आहे.
आपण वैश्विक फॅमिली आहोत. आपल्या सगळ्यांच भविष्य एक आहे, हे G20 आज सांगते. तेच साडेसातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. हे मराठी भाषेचं जगाकडे बघण्याची दृष्टी आहे, असे फडणवीस म्हणाले.
लोक विचारतात की मराठी भाषा टिकेल का? त्या वेळेस प्रतिप्रश्न त्यांना विचारला पाहिजे की, आपण मराठी टिकवणार आहोत का? मराठी टिकवण्यासाठी आपण काही करणार आहोत का? असा सवाल केला पाहिजे.
मराठी भाषा इतक्या दिवस चालत आली कारण आपण पुढच्या पिढीकडे अभिव्यक्तीच साधन म्हणून भाषा दिली. आपण जर पुढच्या पिढीला अभिव्यक्तीच साधन म्हणून मराठी भाषा देणार नाही तर भाषा टिकेल कशी? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.