YouTuber Jyoti Malhotra Spy Case : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) मुंबईत चारवेळी येऊन गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. एवढेच नव्हे तर, या भेटीदरम्यान ज्योतीने लालबागचा राजा (Mumbai Lalbagh Raja) येथील परिसरात व्हिडिओदेखील काढण्याचेही तिच्या फोनमध्ये आढळून आले आहे.
मुंबईतील ते व्हिडिओ कुणाला पाठवले?
ज्योती मल्होत्राने २०२४ मध्ये तीनवेळा तर २०२३ मध्ये एकदा मुंबईचा (Mumbai) दौरा केला होता. मुंबईत अनेक भागात तिने फोटो, व्हिडीओ काढले. २०२३ मध्ये लालबागचा राजा, तिथली गर्दी, याचा व्हिडीओ तिने काढला. हे व्हिडीओ, फोटो तिने कोणाला पाठवले याचा तपास सुरू आहे. २०२३ साली तिने लालबागचा राजा, तसेच गणेशगल्लीचा राजा येथे फिरून तिथली गर्दी, याचा व्हिडीओ काढला होता, त्याचे अनेक रेकॉर्ड हे तपास यंत्रणांना मिळाले आहेत. मुंबईतल्या अनेक भागांचे फोटो काढले होते, मात्र नंतर तिने ते डिलीट केले.
ज्योती जुलै २०२४ मध्ये एका लक्झरी बसने मुंबईला पोहोचली आणि ऑगस्ट २०२४ मध्ये ती अहमदाबादहून कर्णावती एक्सप्रेसने मुंबईला आली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ती पंजाब मेलने नवी दिल्लीहून मुंबईत आली. एवढेच नाही तर २०२३ मध्ये गणपती उत्सवादरम्यान तिने ‘लालबाग का राजा’ दर्शनाच्या बहाण्याने लाखोंच्या गर्दीचा आणि संपूर्ण परिसराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.
नवी धक्कादायक माहिती आली समोर; ज्योतीच्या टार्गेटवर होतं ‘हे’ प्रसिद्ध मंदीर?
लोकलचा प्रवास अन् सविस्तर ब्लॉग
मुंबई दौऱ्यावेळी ज्योतीनं लोकलनं प्रवास केल्याचेही सांगितले जात आहे. बोरिवलीत उतरल्यानंतर तेथून ज्योती लोकलने दादरला आली. त्यानंतर ती दादरहून ट्रेन बदलून चिंचपोकळीला पोहचली होती. यासंदर्भात तिने एक सविस्तर ट्रॅव्हल व्लॉगही लिहिला होता.
दरम्यान, हेरगिरी प्रकरणी आत्तापर्यंत एकूण 8 जणांना पोलिसांनी अटक केली असून या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. या चौकश्यांमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. त्यामुळे आता या हेरगिरी प्रकरणात आणखी कोण आहे का? पाकिस्तानला कोणती माहिती या आरोपींनी पाठवली होती? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.