Download App

PMC News : टक्केवारीचा वाद उफाळला.. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षावर सदस्य भडकले!

  • Written By: Last Updated:

पुणे : पुणे महापालिकेच्या कारभाराचे (PMC News) अनेक सुरस किस्से बाहेर येत असतात. असाच एक किस्सा आज (१७ जानेवारी) रोजी घडला. पदावर असताना टक्केवारीची ठरलेली रक्कम स्थायी समितीच्या अध्यक्षाने पद गेले तरी न दिल्याने त्या समितीतील तत्कालीन सदस्यांनी आज त्या अध्यक्षाच्या खासगी कार्यालयात जाऊन जाब विचारला. प्रत्येक सदस्याचे सुमारे ७८ लाख रुपये या अध्यक्षाने दिले नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका पण स्थायी समितीवर काम केलेल्या एका महिला सदस्याने उग्र रूप धारण करत या माजी पदाधिकाऱ्याची पाचावर धारण बसवली. पण `जय गणेश` म्हणत या अध्यक्षाने असे काही ठऱल्याचे आठवत नसल्याचा पवित्रा घेतला. त्यावरून सदस्य आणखी चि़डले.

स्थायी समितीत कोट्यवधीचे टेंडर मंजूर होतात. यातील टक्केवारी म्हणजे लाच सदस्यांना आणि अध्यक्षाला हक्काचीच वाटते. या लाचेच्या रकमेचे म्हणे सूत्रही ठरलेले असते. मात्र एका अध्यक्षाने हे सूत्र न पाळल्याने हा वाद उफाळला. या टक्केवारीच्या रकमेचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी स्थायी समितीचे माजी सदस्य या माजी अध्यक्षाच्या कार्यालयात आज गेले. तेथे रकमेवरून बराच वाद झाला. भाजपच्या मंडळींनीही या अध्यक्षाला धारेवर धरले. तुमची तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करू, असे या सदस्यांनी बजावले. त्यावर `जय गणेश` म्हणत, या अध्यक्षाने ती रक्कम आपल्याकडे नसल्याचे सांगत पक्षातील दुसऱ्याच नेत्याचे नाव घेतले. मग त्या नेत्यालाही फोन करण्यात आला. त्या नेत्याने ही रक्कम आपल्याकडे आलीच नसल्याचे सांगत त्या अध्यक्षाची कोंडी केली.

मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक सदस्याचे सुमारे ७८ लाख रुपये या अध्यक्षाने थकवले आहेत. स्थायी समितीचे असे १६ सदस्य आहेत. म्हणजे सुमारे १२.५० कोटी रुपये या अध्यक्षानेच घेतल्याचा आऱोप या सदस्यांनी केला. अर्थात आपण लवकरच हा वाद सोडवू असे म्हणत अध्यक्षांना सदस्यांची कशीबशी समजूत काढली. सध्या पुरता तरी हा वाद पुढे गेला आहे.

Tags

follow us