मुंबई : येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवार (24 ऑगस्ट) एका विमानात बॉम्ब असल्याच्या फोनने एकच खळबळ उडाली होती. मात्र तपासाअंती हा कॉल खोटा असल्याचा आणि तो साताऱ्यातील एका 10 वर्षांच्या मुलाने केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीआयडी आणि क्राईम पेट्रोल बघून मुलाने हे कृत्य केले असल्याची माहिती आहे. (A 10-year-old boy claimed that there was a bomb at the Mumbai airport after watching CID and Crime Patrol)
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक फोन आला. यात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभ्या असलेल्या आणि पुढील 10 तासांमध्ये उड्डाण करणाऱ्या एका विमानात बॉम्ब ठेवल्याचा दावा संबंधित व्यक्तीने केला. पोलिसांनी तात्काळ ही माहिती सहार पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून सहार पोलिसांनीही तात्काळ विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना याबाबत सुचना दिली.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत सर्व विमानांची झडती घेतली, तसंच संपूर्ण विमानतळाची सुरक्षा तपासणी केली. मात्र कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही. त्यानंतर फसवा कॉल असल्याचे समोर आले. पोलिसांनी प्राथमिक तपास केला कॉल करणारा व्यक्ती सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील असल्याचे समजले. मात्र कॉल करण्यासाठी वापरण्यात आलेला फोन हा कॉल केल्यानंतर लगेचच बंद झाल्याचेही निदर्शनास आले.
सातारा पोलिसांच्या एका पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन तपास केला असता खळबळ उडवून देणारा फसवा कॉल 10 वर्षांच्या एका आजारी आणि अंथरुनाला खिळलेल्या मुलाने केला असल्याचे समोर आले. त्याने त्याच्या आईचा फोनवरुन 112 वर (महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम) कॉल केला. हा कॉल मुंबई पोलिस नियंत्रण कक्षात स्थानांतरित करण्यात आला.
किराणा दुकान असलेल्या संबंधित मुलाच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये त्यांच्या मुलाला एका दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. तेव्हापासून तो अंथरुणाला खिळून आहे. मात्र तो टीव्हीवर सातत्याने सीआयडी आणि क्राईम पेट्रोल सारखे विविध रिअॅलिटी आणि क्राईम शो पाहत राहतो. कदाचित त्याने पाहिलेल्या एका शोमधून हा कॉल करण्याची कल्पना त्याला आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाने क्राईम शोमधून मिळालेल्या नंबरवरुन कंट्रोल रुमला कॉल केला. मात्र हा कॉल करताना त्याचा कोणताही वाईट हेतू नसल्याचे निष्पन्न झाल्याने मुलाविरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. तसंच त्याच्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई केली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पण आम्ही कुटुंबाचे समुपदेशन केले असून त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली असल्याचेही पोलिसांनी सांगितले.