मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नवीन वर्षातील तिसरा महाराष्ट्र दौरा ठरला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी मुंबई, पुणे आणि साताऱ्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील कोस्टल रोड, पुण्यातील विमानतळाचे नवीन टर्मिनलचे आणि मेट्रोच्या विस्तारित मार्गिकेचे उद्घाटन पार पडणार आहे. मात्र त्यांच्या याच दौऱ्यावरुन आणि कोस्टल रोडच्या उद्घाटन कार्यक्रमावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
आदित्य ठाकरे म्हणाले, कोस्टल रोडचा प्रस्ताव प्रथम उद्धव ठाकरेंनी जुलै 2013 मध्ये मांडला, त्यानंतर ह्या प्रस्तावाच्या परवानगीसाठी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. 2017-18 मध्ये कामाला सुरुवात झाली. 2022 मध्ये आमचे सरकार भेकड गद्दारांनी पाडले, पण तोपर्यंत 65% काम पूर्ण झाले होते. आम्ही दर आठवड्याला, प्रत्येक महिन्यात तेथे भेट देऊन कामाचा आढावा घेत होतो. (Aditya Thackeray strongly criticized the Shinde government from the inauguration program of Coastal Road.)
मुंबई कोस्टल रोड…
कोस्टल रोडचा प्रस्ताव प्रथम उद्धव ठाकरेंनी जुलै २०१३ मध्ये मांडला, त्यानंतर ह्या प्रस्तावाच्या परवानगीसाठी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला.
२०१७-१८ मध्ये कामाला सुरुवात झाली. २०२२ मध्ये आमचे सरकार भेकड गद्दारांनी पाडले, पण तोपर्यंत ६५% काम… pic.twitter.com/RgZuGhuY98
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 2, 2024
भारतातल्या सर्वात मोठ्या टनेल बोरिंग मशीनचे येथे काही फोटो देत आहे : मावळा! कोविडच्या काळात हे मशीन आले, तेव्हा BMC अधिकाऱ्यांनी विचारले, ह्याला काय म्हणायचे? त्यावेळी मी “मावळा” नाव सुचवले… TBM चे काम पाहिल्यावर लक्षात येते, मुंबईतला मलबार हिल फोडून समुद्राखालचा तो पहिला बोगदा बनवला गेला. TBM च्या ह्या कामाला साजेसं एकमेव नाव… मावळा! अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेच, ज्यांनी महाराजांना अशक्य कामातही यशस्वी मदत केली.
कोस्टल रोड आणि मुंबईशी अजिबात देणेघेणे नसलेल्या महाराष्ट्राची सत्ता बेकायदेशीररित्या बळकावणारे आणि मुंबईची लूट करणारे राजकारणी या अर्धवट काम राहिलेल्या कोस्टल रोडचे उद्घाटन करुन निवडणुकीत श्रेय घेऊ पाहतील. काम पूर्ण न झालेला कोस्टल रोड सुरू करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट ठरेल. पण राजकारणच करू पाहणाऱ्यांकडून दुसरी तरी काय अपेक्षा करणार? मुंबईचा वापर राजकारणासाठी केला जात आहे, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.
नवीन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा महाराष्ट्रात येत आहेत. यापूर्वी 12 जानेवारी रोजी रोजी पंतप्रधान मोदी नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये 27 व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाला उपस्थित राहिल्यानंतर ते अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुंबईत आले होते. त्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. इथे त्यांच्या हस्ते 15 हजार घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर आता ते आता पुन्हा एकदा मुंबई, पुणे आणि साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागात विभागला गेला आहे. यात मुंबई ते कांदिवली या सुमारे 29 किमीच्या भागाचे काम प्रथम हाती घेण्यात आले होते. तर मरीन ड्राईव्ह ते वरळी-वांद्रे सी लिंक हा साडेदहा किलोमीटरचा पट्टा दुसऱ्या टप्प्यात येतो. 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यातील मरीन ड्राइव्ह ते वरळी या साडे दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन होणार आहे. तर पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रोच्या विस्तारित मार्गिकेचेही उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.