बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील वाघांचे आणि पेंग्विनचे कुटुंब विस्तारले आहे. रॉयल बेंगॉल टायगरच्या जोडीने म्हणजेच ‘शक्ती आणि करिश्मा’ने 4 नोव्हेंबर 2022 रोजी दोन बछड्यांना जन्म दिला होता, तर पेंग्विन कक्षातही पेंग्विनच्या तीन जोडप्यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन गोंडस पेंग्विन पिले जन्माला घातली. या नव्या पाहुण्यांमुळे वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय अधिक समृद्ध झाले आहे. उद्या गुरुवार दिनांक 11 मे 2023 पासून पर्यटक या नवीन पाहुण्यांना पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.
सध्या उन्हाळी सुट्या असल्याने दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात भेट देत आहेत. त्यातील अनेकांना वाघ शक्ती आणि वाघीण करिश्मा यांना पाहण्याची खूप उत्सुकता असते. तसेच मागील काही वर्षांपासून प्राणिसंग्रहालयात आलेले पेंग्विन पाहण्यासाठीदेखील पर्यटक येतात. मात्र आता या दोन्ही ठिकाणी आलेल्या पाहुण्यांमुळे पर्यटकांची ही सफर यादगार ठरणार आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे विस्तारिकरण, पर्यटकांसाठी नवनवीन आकर्षणे आदींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. प्राणिसंग्रहालयातील वाघ, पेंग्विन पर्यटकांचे विशेष आकर्षण आहेत. वाघांचे तसेच पेंग्विनचे कुटुंब विस्तारले असून सर्व अधिकारी-कर्मचारी या बछड्यांची आणि पेंग्विनच्या पिलांची निगा ठेवत आहेत.
जय आणि रुद्र उमटवत आहेत ठसे
छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातून दिनांक 12 फेब्रुवारी 2020 रोजी शक्ती वाघ (वय 7 वर्षे) आणि करिश्मा वाघीण (9 वर्षे) या जोडीला वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात आणले आहे. करिश्मा वाघीणने गत वर्षी दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी दोन रुबाबदार नर बछड्यांना जन्म दिला आहे. तेव्हापासून करिश्मा आपल्या दोन्ही बछड्यांना एकेक धडे गिरवत पालन करीत आहे. आता या दोन्ही बछड्यांचे वय 6 महिने आणि 4 दिवस आहे. दोन्ही बछडे त्यांच्या आवारात सैर करीत असतात. पुढील दीड ते दोन वर्षे या बछड्यांना करिश्मासोबतच ठेवण्यात येणार आहे. प्राणिसंग्रहालयातील वैद्यकीय पथकाने जय आणि रुद्रची काळजी घेत त्यांचे वेळोवेळी लसीकरण आणि इतर महत्त्वाच्या तपासणी केल्या आहेत. सध्या हे दोघे लहान असल्याने त्यांच्यासाठी खाद्यगृहाचे दरवाजे खुले ठेवलेले असतात. तसेच जो मांसाहार करिश्माला पुरविला जात आहे तोच जय आणि रुद्रला दिला जात आहे. हे बछडे आणि करिश्मा तळ्यात आणि हिरवळीवर सैर करतात. आता पर्यटकांना एक दिवसाआड जय आणि रुद्रसह करिश्माला तर दुसऱ्या दिवशी शक्तीला पाहण्याचा आनंद घेता येणार आहे, असे उपायुक्त (उद्याने) श्री. किशोर गांधी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उप अधीक्षक तथा पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल राऊळ यांनी कळविले आहे.
पेंग्विन कक्षातही वाढली किलबिल
प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षातील पेंग्विनच्या तीन जोडप्यांनी प्रत्येकी एक अशा तीन पिलांना जन्म दिला आहे. त्यामुळे पेंग्विनची संख्या वाढून आता एकूण 15 झाली आहे.
डोरा, सिरी, निमो मुंबईकारांच्या भेटीला
पेंग्विन कक्षात सध्या नर आणि मादी अशा चार जोड्या आहेत. त्यात डोनाल्ड आणि डेझी या जोडीने दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी डोरा (मादी), मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी सिरी (मादी) तर पपाय आणि ऑलिव्ह या जोडीने दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी निमो (नर) अशा तीन पिलांना जन्म दिला. ओरिओ आणि बबल या पेंग्विन जोडीला अद्याप पिलांची प्रतीक्षा आहे.
इवल्या इवल्या पिलांना मायेची उब
सध्या डोरा, सिरी आणि निमो यांना प्राणिसंग्रहालयातील डॉ. मधुमीता काळे आणि त्यांचे वैद्यकीय पथक मायेची उब देत आहे. या पिलांना मासे आणि बोंबील आहारात देण्यात येत आहेत. पिले लहान होती तेव्हा त्यांचे आई-वडीलच त्यांना भरवत होती, मात्र आता ही पिले स्वतः तळ्यात आणि तळ्याकाठी बागडत असतात. प्राणिसंग्रहालयातील वैद्यकीय पथक त्यांची काळजी घेत आहेत. अधून-मधून त्यांचे जन्मदातेही या तळ्यात पिलांसोबत पहुडलेले दिसून येतात. डोरा, सिरी आणि निमो यांना देखील पाहणे आता पर्यटकांना शक्य होणार आहे.