मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि प्रदेश प्रभारी एच.के. पाटील (H.K. Patil) यांच्या वरळीतील थोरातांच्या निवासस्थानी बैठक झाली. विधीमंडळातील पक्षनेते पदाचा बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या मनधरणीचे प्रयत्न काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठांकडून सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक असल्याचे बोलले जाते.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील आज दुपारी बाळासाहेब थोरात यांच्या घरी पोहचले होते. बराच काळ ही बैठक सुरू होती. सत्यजित तांबे यांच्या प्रकरणानंतर बाळासाहेब थोरात यांचे नाराजीनाट्य सुरु झाले होते. या संदर्भात बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडला पत्र लिहून नाराजी कळवली होती. पक्षात वरिष्ठ असताना देखील माझा अपमान केला जातो. नाशिक पोटनिवडणूकीत मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे सांगत त्यांनी हायकमांडला पत्र लिहिले होते.
Sharad Pawar : वर्ध्यात टेक्सटाईल पार्क उभारणीसाठी पंतप्रधानांशी बोलू…!
पक्षातील गटबाजीवर नाराज होऊन बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळातील पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. थोरातांच्या राजीनाम्यानंतर एच. के. पाटील हे पहिल्यांदा मुंबईत आले आहेत. त्यानंतर त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांच्यात आर्धा तासापेक्षा जास्त वेळ बैठक झाली.
थोरातांचं नेमकं म्हणणं काय आहे हे एच. के. पाटील समजून घेतील. त्यांनी विधीमंडळातील पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे तो मागे घेण्यात यावा यासाठी देखील मनधरणी करतील. त्यामुळे आजची ही बैठक महत्वाची मानली जात आहे. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमधील मोठं नाव आहे. ते नाराज झाल्यानंतर काँग्रेस पक्षावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली होती. आता या बैठकीनंतर एच. के. पाटील यांना थोरातांची मनधरणी करण्यात यश येतंय का? की बाळासाहेब थोरात आपल्या निर्णयावर ठाम राहतात? हे या बैठकीतून स्पष्ट होणार आहे.