Baba Siddiqui Shot Dead : महाराष्ट्र सरकारमध्ये काही काळ मंत्री राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी हत्या करण्यात आली. तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. दुसरीकडे या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राजकीय नेतेच सुरक्षित नसतील तिथं सामान्य माणसांचं काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. बाबा सिद्दीकी सुरुवातीच्या काळात घड्यााळ दुरुस्त करायचे पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश करून थेट मंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यांचा हाच प्रवास जाणून घेऊ या..
बाबा सिद्दीकींचं पूर्ण नाव बाबा झियाउद्दीन सिद्दीकी असे होते. ते मुळचे बिहारचे रहिवासी होते. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1956 रोजी झाला होता. वडिलांबरोबर ते स्वतः घड्याळ दुरुस्ती करायचे. याच काळात त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून राजकारणालाही सुरुवात केली होती. बीएमसीमध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सन 1977 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना एनएसयूआयमध्ये प्रवेश केला. 1980 मध्ये वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस, 1982 मध्ये वांद्रे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि 1988 मध्ये मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
नवाब मलिकांचे जावई समीर खान यांचं निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात
सन 1999 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघात काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवला. यानंतर 2014 पर्यंत त्यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. याच काळात त्यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपदी काम करण्याची संधी मिळाली. सन 2004 ते 2008 या चार वर्षांच्या काळात बाबा सिद्दीकी अन्न आणि कामगार राज्यमंत्री होते. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पराभव झाला तरी काँग्रेस पक्षाने त्यांना मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केले. 2019 मध्ये त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संसदीय मंडळात काम करण्याची संधी मिळाली.
मागील दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतरच्या काळात बाबा सिद्दीकी लवकरच काँग्रेस सोडतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई विभागाचे अध्यक्ष म्हणूनही बाबा सिद्दीकी यांनी काही काळ काम पाहिले होते.
मुंबईतील वांद्रे भागात बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळी राहतात. त्यामुळे बॉलिवूड सेलब्रिटींशी बाबा सिद्दीकी यांची जवळीक निर्माण होण्यामागे हे देखील एक कारण होतं. राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात बाबा सिद्दीकी यांनी तेव्हाचे लोकप्रिय अभिनेते सुनील दत्त यांची भेट घेतली होती. त्यावेळी सुनील दत्त योगायोगाने काँग्रेसमध्येच होते. राजकारणात असल्याने दोघांची मैत्रीही होती. पुढे सुनील दत्त यांनी मुलगा संजय दत्तशी सिद्दीकी यांची ओळख करून दिली. नंतरच्या काळात संजय दत्तने त्यांची सलमान खानशी ओळख करून दिली होती.
बांग्लादेशचा सुपडा साफ! तिसरा सामना जिंकत भारताने साकारला मालिका विजय
बाबांचे बॉलिवूडमधील अन्य कलाकारांशीही चांगले संबंध होते. त्यांनी दिलेल्या इफ्तार पार्टीत हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आवर्जुन हजेरी लावत असत. 2013 मधील अशाच एका इफ्तार पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील पाच वर्षे जुने वाद संपुष्टात आले होते. त्यांचे वाद मिटवण्यात बाबा सिद्दीकी यांनीही प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले होते.