Yugendra Pawar met Sharad Pawar : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. यासाठी त्यांनी राज्याचा दौरा देखील सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अजित पवारांना बरामतीमध्येच मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांचे सख्ये पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
एकीकडे अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडून शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे. पक्षातील बहुतांश आमदारांनी देखील अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे युगेंद्र पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने अजितदादांच्या बंडाला शह देण्याचा तर प्रयत्न नाही ना असे तर्क लावले जात आहेत.
बारामती मतदारसंघाचे गणित कसे असणार?
राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार याची सध्या जोरदार चर्चा आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीकर नाराज आहेत पण अजित पवार यांच्या विरोधात कोणीही निवडून येऊ शकत नाही, असे सांगितले आहे. पण येणाऱ्या काळात अजित पवार यांना शह देण्यासाठी युगेंद्र पवार यांना शरद पवार गटाकडून ताकद दिली जाऊ शकते.
कोण आहेत युगेंद्र पवार ?
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. युगेंद्र यांच्या मातोश्री शर्मिला पवार या गेल्या अनेक वर्षापासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती व इंदापूर तालुक्यात कार्यरत आहेत. युगेंद्र पवार हे राजकीयदृष्ट्या सक्रीय नसले तरीही बारामती शहरात ते विविध उपक्रमांच्या माध्यमातून काम करत असतात. शरद पवार हे देखील युगेंद्र यांच्या विविध उपक्रमांना भेट देत असतात. त्यामुळे युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे.
‘आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी अन् आता’… रोहित पवारांनी सांगितला भाजपाचा प्लॅन!
युगेंद्र पवार हे तीन वर्षांपासून महाऑरगॅनिक रेश्युड्युफ्री फार्मर्स असोसिएशन या सेंद्रीय शेती उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. तसेच बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद देखील युगेंद्र पवार यांच्याकडे आहे.