Download App

Sharad Pawar : ‘स्वतःच्या पक्षाचा ऱ्हास का झाला त्याची चिंता करा’; भाजप नेत्याचा पवारांना टोला

Sharad Pawar : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावर विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यानंतर काल अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर याचे खापर फोडले. त्यांच्याच काळात कंत्राटी भरतीचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पाप आमच्या माथी नको, असे म्हणत त्यांनी हे निर्णय रद्द केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही आक्रमक भुमिका घेत शरद पवार (Sharad Pawar) आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी बावनकुळेंची लायकीच काढली होती. यानंतर हा वाद आणखी वाढला आहे. आता भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी शरद पवारांना एक सल्ला दिला आहे.

‘…तर आमचा प्रखर विरोध राहणार’; मुळामधून पाणी सोडण्यावरुन गडाख कडाडले

दरेकर म्हणाले, पवार यांनी भाजप आणि बावनकुळे यांची चिंता करू नये. अजितदादांसारख्या नेत्याबरोबर आपला 90 टक्के पक्ष निघून का गेला याचा विचार त्यांनी करावा. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांसारखे ज्येष्ठ आणि एकनिष्ठ साथीदार आपल्याला सोडून का गेले याचे आत्मपरिक्षण त्यांनी करावे. पवार यांनी भाजपाची आणि भाजप नेत्यांची नसती उठाठेव करू नये, तर स्वतःच्या पक्षाचा ऱ्हास का झाला याचे आत्मपरिक्षण करून चिंता करावी.

शरद पवारांची टीका काय ?

या गृहस्थांचं (चंद्रशेखर बावनकुळे) समाजात, जनमानसात नक्की काय स्थान आहे हे मला माहिती नाही. एकच उदाहरण सांगतो. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीटही दिलं नव्हतं. ज्या व्यक्तीबद्दल स्वतःचा पक्ष तिकीट द्यायलाही लायक नाही असं म्हणतो त्याच्यावर आपण काय भाष्य करायचं.

बावनकुळे बारामतीवर बोलतात कारण लोकांनी बातमी वाचावी आणि बातमी छापावी असं वाटत असेल तर बारामतीचं नाव घ्यावं लागतं. त्यामुळेच त्यांच्याकडून बारामतीचा उल्लेख सारखा केला जातो. जे पक्षाला तिकीट देण्यासाठीही योग्य वाटत नाहीत त्यांनी बारामतीवर चर्चा करण्याचं काहीच कारण नाही, अशा तिखट शब्दांत पवार यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले होते.

BJP : ‘तुमच्या याच प्रवृत्तीमुळे संपूर्ण पक्ष फुटला’; बावनकुळेंवरील पवारांची टीका भाजपला झोंबली

Tags

follow us