2019 ची लोकसभा निवडणूक. भाजप-शिवसेना युतीची सत्ता असतानाही दोन्ही पक्षांचे संबंध तुटेपर्यंत ताणले होते. त्यामुळे शिवसेनेने स्वबळाची भाषा सुरु केली होती. पण भाजपला मात्र शिवसेनेची साथ हवीच होती. त्यासाठी भाजपचे (BJP) चाणक्य अमित शाह (Amit Shah) मातोश्रीवर आले आणि त्यांनी तेव्हाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाशी चर्चा केली. बरीच समजूत काढल्यानंतर शिवसेना भाजपशी युती करण्यासाठी तयार झाली. (BJP orders Ghatkopar East MLA Parag Shah to prepare for Lok Sabha polls instead of both Manoj Kotak and Kirit Somaiya)
पण शिवसेनेने भाजपसमोर काही अटी ठेवल्या. त्यातील एका अटीमुळेच भाजपचे केवळ नगरसेवक असलेल्या मनोज कोटक यांना थेट खासदारकीची लॉटरी लागली होती. त्यावेळी उत्तर मध्य मुंबईचे खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांना कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची उमेदवारी द्यायची नाही, अशी अट ठाकरेंनी घातली होती. सोमय्या यांनी त्यावेळी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर थेटपणे वार केले होते. त्यांनी ठाकरे यांना थेट माफियाची उपमा दिली होती.
अखेरीस युतीची तडजोड म्हणून भाजपने ही अट मान्य केली अन् शिवसेनेने सोमय्यांचा हिशेब चुकता केला. पण त्यामुळे भाजपने शेवटच्या क्षणी नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी देऊ केली. किरीट सोमय्या यांच्यासारख्या कसलेल्या खासदाराचा पत्ता कट करून मनोज कोटक यांना उमेदवारी मिळणे, हा तेव्हा सर्वांसाठीच एक मोठा आणि अनपेक्षित धक्का ठरला होता. पण आता याच कोटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. याला कारण ठरले आहेत तेच किरीट सोमय्या. सोमय्या यांनी या मतदारसंघातून पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे.
त्यावेळी केवळ ठाकरेंच्या विरोधामुळे आपल्याला तिकीट नाकारण्यात आले होते. पण आता या तिकीटावर आपलाच दावा आहे, असे सोमय्या सांगत आहेत. त्यामुळे भाजप श्रेष्ठींपुढेही मोठा पेच उभा राहिला आहे. यावर उपाय म्हणून भाजपने दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी रणनीती अवलंबली असल्याची माहिती आहे. कोटक आणि सोमय्या या दोघांच्याही ऐवजी भाजपने घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शहा यांना लोकसभेसाठी तयारी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे.
जातीच्या गणितानुसार या मतदारसंघामध्ये मराठी, गुजराथी, उत्तर भारतीय हिंदी भाषिक, मुस्लिम दलित आणि दक्षिण भारतीय असा संमिश्र मतदार आहे. भांडुप आणि विक्रोळी, टागोरनगर, कन्नमवार नगर हा मराठी बहुल भाग आहे. भांडुप आणि घाटकोपर पश्चिम हा गुजराथी बहुल भाग आहे. घाटकोपर पश्चिम तसेच मानखुर्द शिवाजीनगर हे झोपडपट्टीचे अधिक प्रमाण असलेले मतदारसंघ आहेत. यात मराठी, मुस्लिम दलित आणि दक्षिण भारतीय मतदार यांचा प्रभाव मोठा आहे. याच हिंदी भाषिक आणि गुजराथती भाषिक उमेदवारांना आपलेसे करण्यासाठी भाजपने गत दोन्ही निवडणुकींमध्ये सोमय्या आणि कोटक अशा गुरजाथी भाषिक उमेदवारांना उमेदवारी दिली होती. आता पुन्हा एकदा पराग शहा यांना उमेदवारी देऊन भाजप गुजराथी कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे.