Mla Mahesh Baldi : रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघाचे भाजप (BJP) आमदार महेश बालदी (Mahesh Baldi) यांना जुन्या प्रकरणात तीन वर्षांची कारावासाची शिक्षा झालीय. अलिबाग न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्यामुळे बादली यांची आमदारकी धोक्यात आली आहे.
महेश बालदी यांच्यासह या प्रकरणातील अन्य तीन अशा एकूण चार आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तब्बल 16 वर्षांपूर्वी घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणात न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. मात्र, शिक्षा सुनावल्यानंतरही चारही आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच या निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आमदार महेश बालदी यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
नेमकं काय आहे 2010 मधील प्रकरण?
ही घटना 2010 मध्ये रायगड जिल्ह्यातील उरण येथे घडली होती. एका मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून संबंधित तरुणाला जाब विचारण्यासाठी आमदार महेश बालदी आणि काही अन्य व्यक्ती गेले होते. यावेळी संबंधित तरुणाला मारहाण करण्यात आली. तसेच त्याला शिवीगाळही करण्यात आली होती. या मारहाणीत तरुणाला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप होता. या घटनेनंतर संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुरू होती.
16 वर्षांनंतर न्यायालयाचा निकाल
या प्रकरणाची सुनावणी अनेक वर्षे सुरू होती. तारखावर तारखा पडत होत्या. अखेर तब्बल 16 वर्षांनंतर न्यायालयाने निकाल जाहीर केला. न्यायालयाने आमदार महेश बालदी यांच्यासह चारही आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र, आरोपींना जामीन मंजूर झाल्याने त्यांना तातडीने कारागृहात जावे लागणार नाही. या निकालाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्यासाठी त्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
