पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीर म्हणूनच आहे. त्यामुळे कोणी काही म्हणू द्या, छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीरच आहे आणि कायम राहणार, अशी भूमिका भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली आहे. ते आज पुण्यात बोलत होते.
धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करून त्याची अंमलबजावणी करावी सोबत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा. या मागणीसाठी आज पुण्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. त्यावेळी या मोर्चा दरम्यान छत्रपती शिवेंद्रराजे बोलत होते.
यावेळी बोलताना शिवेंद्र राजे भोसले म्हणाले की, हिंदू समाजाला जे भीतीचे वातावरण झाले आहे. त्या भीतीला वाचा फोडण्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला आहे. प्रत्येक शहरात तालुक्यात असे मोर्चे काढले जात आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी आमच्याच विचारांच सरकार असल्याने सरकार निश्चित दखल घेईल.”
याशिवाय पुढे बोलताना ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यामध्ये धर्माचे रक्षण करणे हा देखील भाग होता. त्याचबरोबर आम्ही कोणाच्याही विरोधात नाही. आम्ही धर्म रक्षणच कार्य करीत आहोत.आत्तापर्यंत आपण जो इतिहास वाचला. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीर म्हणूनच आहे. त्यामुळे कोणी काही म्हणू द्या, छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीरच आहे आणि कायम राहणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.