पुणे : जी -20 परिषदेचे आयोजकपद भारताकडे आले आहे. पुणे शहरात जानेवारी, जून आणि सप्टेंबर अशी तीन वेळा बैठक पार पडणार आहे. 16 आणि 17 जानेवारी रोजी या परिषदेसाठी जगातील 37 देशातील 120 प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची, पुणे शहराची संस्कृती, येथील विकास दाखवण्याची चांगली संधी पुणे शहराला मिळाली असून शहरातील नागरिकांनी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या स्वागतामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
जी -२०’ बैठक स्थळाशेजारी ५ प्रदर्शन दालने लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुणे पालिकेकडून शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात सुरु असलेल्या कामांची माहिती असणारे दालन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, औद्योगिक क्षमता प्रदर्शित करणारे दालन, भारतीय जनजातीय सहकारी विपनन विकास महासंघ आणि महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योगची उत्पादनांचा समावेश असलेले दालन उभारण्यात येणार आहेत.
दरम्यान, ‘जी -२०’ परिषदेच्या तयारीबाबत पाटील यांच्या अध्यक्षक्षतेखाली हॉटेल आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे आदी उपस्थित होते.