Sanjay Raut on Eknath Shinde : मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यातील तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याशी डिलिंग केली जात आहे. तसेच या अट्टल गुन्हेगारांना निवडणुकी आधी बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असा सनसनाटी आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबतचे पुरावे लवकरच देणार असल्याचं राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातून अनेक तुरुंगातील भयंकर गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. काही लोकांना जामीन देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. त्याबाबतचे लवकरच पुरावे देईल. 302 च्या गुन्ह्याखाली आत असलेल्या गुन्हेगारांना निवडणुकीपूर्वी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी गुन्हेगारांशी डिलिंग सुरु आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
झाकीर नाईक याच्यावर टेलर फंडिंगचा आरोप आहे. त्याच्याकडून विखे पाटलांच्या खात्यात पैसे गेले त्यांच्यावर काय कार्यवाई झाली का? राहुल कुल यांचं काय झालं? दादा भुसे गिरणा सहकारी साखर कारखाना काय कारवाईचे काय झालं? 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा कालपर्यंत तुम्ही बोलत होतात आज त्यांच्यासोबत सत्तेत बसलात. त्या आरोपांचं काय झालं? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
कलंकित शब्दाच्या आरपार मिरच्या घुसल्या आहेत, ही मिरच्यांची धुरी आहे ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र कलंकित केला. कलंकित शब्दावर बंदी आहे का? फडणवीस यांना सध्या फार लवकर मिरच्या झोंबतात त्यांची निराशा उसळून येते, असे हल्लाबोल राऊत यांनी केला.
ते पुढं म्हणाले की काय करत आहेत गृहमंत्री? या गोष्टीचा देवेंद्र फडणवीस यांना राग आला पाहिजे. मी लोकप्रतिनिधी आहे. राजकारण नंतर. समजून घ्या आम्ही काय सांगतो ते. तुम्ही घटनात्मक पदावर आहात मिस्टर फडणवीस. आमचं काय वाकडं करणार आहात? जे करायचं ते करा. हिंमत असेल तर आमनेसामने लढा, असं आव्हान संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिलं.
Maharashtra Politics : ‘उद्धव ठाकरेच मोठा कलंक’; विखे पाटलांचा घणाघात
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तुरुंगातील गुन्हेगारांशी कसा संवाद सुरु आहे याची माहिती मी देणार आहे. सरकारमधील लोक मुंबईपासून नाशिकपर्यंतच्या तुरुंगातील कैद्यांशी संवाद साधून आहेत. तुरुंगातून मोबाईलचा वापर सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जे सुरु आहे ते लवकरच बाहेर काढेल. तुम्ही गृहमंत्री आहात त्यावर ध्यान द्या. तुमचं फ्रस्ट्रेशन बाहेर काढू नका, असेही संजय राऊत म्हणाले. तुरुंगाच्या दारात कैद्यांची भेट घेतली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयावर लक्ष ठेवा. मुख्यमंत्री कार्यालयात अंडरवर्ल्डची टोळी बसली आहे, अशी टीका त्यांनी केली.