अंधेरी : मुंबईत गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सर्वच मोठी मंडळे आता गणेशोत्सवासाठी सज्ज झाली आहेत. गणपती बाप्पा विराजमान होण्याआधीच मुंबईतील प्रसिद्ध गणपतींच्या यादीत समाविष्ट असलेल्या अंधेरीचा राजा (Andhericha Raja) गणेशोत्सव मंडळ चर्चेत आलं आहे. अंधेरीच्या राजा मंडळाने यावेळी भाविकांसाठी वेगळीच अट ठेवली आहे. अंधेरीच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना हाफ पँट, शॉर्ट स्कर्ट घालण्यास मनाई करण्यात आली आहे.
मुंबईतील गणपती मूर्ती हे अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळं गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी राज्यभरातून अनेक भाविक मुंबईत येतात. मात्र, अधेरी राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा वस्त्रसंहिता लागू केली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून यावर खुलासा करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी दर्शनासाठी येताना पूर्ण पोशाखात यावं, असे सांगितले. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
Inside Story : CM शिंदेंचा दूत जालन्यात आला अन् मनोज जरांगे पाटील उपचारासाठी तयार झाले…
हाफ पँट किंवा शॉर्ट स्कर्ट घालण्याऐवजी फुल पँट घालावी. याशिवाय स्लीव्हलेस कपडे घालण्यावरही मंडळाने बंदी घातली आहे. मंडळाने पूर्ण लांबीचे कपडे घालण्यास सांगितले आहे. देवाची पूजा करताना लोकांना काही अयोग्य वाटेल असं काहीही न घालण्याचं आवाहनही मंडळाने केले आहे. गेल्या वर्षीही मंडळाने हा निर्णय घेतला होता. त्यावेळीही या मुद्द्यावरून बराच वाद झाला होता. मात्र यंदाही हा निर्णय मंडळाने घेतला आहे.
दरम्यान, मंडळाच्या या निर्णयाला अनेक संघटनांनी विरोध केला आहे. मात्र, मंडळ आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळं हा वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून काही पावलं उचलण्यात येणार का, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
गेल्या अठ्ठावन वर्षापासून अंधेरी पश्चिमेकडील आझादनगर परिसरात या गणपतीची स्थापना केली जाते. पुढील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण होतील. त्यामुळं यंदा अंधेरीच्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा करण्यात आला आहे.