पुणे : बेकायदेशीर रित्या शेकडो कोटींचं कर्ज दिल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड या भागातील द सेवा विकास सहकारी बँकेचा माजी संचालक अमर मुलचंदाणीच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. सीआयएसएफचे जवान आणि पोलिस बंदोबस्त तैनात करून ईडीने ही छापेमारी सकाळपासून सुरू केली होती.
या बॅंकेने म्हणजे या बॅंकेच्या संचालकांनी तब्बल 124 बनावट कर्जांचे प्रस्ताव तयार केले होते. यातून त्यांनी 430 कोटी रूपयांचे कर्ज विविध व्यक्ती आणि संस्थांना बेकायदेशीररित्या दिले. ज्या व्यक्तींना हे कर्ज देण्यात आले त्यांना हे कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती. त्यामुळे कोणतेही निकष न तपासता देण्यात आलेल्या या कर्ज प्रकरणावरून बँकेचा माजी संचालक अमर मुलचंदाणीच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे.
यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले. सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट केले होते. त्यानंतर हे घोटाळा उघडकीस आले. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अमर मूलचंद यांच्यासह पाच जणांना अटक केली होती. अटकेत असलेले अमर मूलचंदानी काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आले. त्यानंतर आज ईडीने छापा टाकला. बँकेवर आरबीआयने प्रशासक नेमला आहे. या बँकेत हजारो ठेविदारांचा कोट्यवधींचा पैसा अडकून आहे.