मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतोदपदी अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) तर मुख्य प्रतोदपदी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी विधानपरिषदेत (Legislative Council) ही घोषणा केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यापासून एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी नियुक्ती होणार असल्याची विधान भवन परिसरात चर्चा होती. आज अधिकृतरित्या त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. प्रतोदपदी अनिकेत तटकरे तर मुख्य प्रतोदपदी शशिकांत शिंदे यांच्या नावांची देखील घोषणा करण्यात आली आहे.
कसब्यातील पराभवाचा राग ब्राह्मण समाजावर! हिंदू महासंघाचा भाजपवर आरोप
एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामाकाजाचा अनुभव आहे. खडसेंच्या माध्यामातून जळगावमध्ये राष्ट्रवादीला अधिक बळ मिळेल आणि आगामी निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल, हे गणित बांधून पक्षाने त्यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली असण्याची शक्यता आहे.
भाजप नेते गिरीष महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय संघर्ष राज्यातील जनतेला सर्वश्रुत आहे. भाजपमधून एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यापासून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल अशी चर्चा होती. मधल्या काळात ते आजारी असल्याने राजकारणापासून काही काळ दूर होते. आजारपणातून बरे झाल्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाची आक्रमक भूमिका मांडताना ते दिसून येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषेदेतील निवडीच्या निमित्ताने राजकीय संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. साताऱ्याचे शशिकांत शिंदे यांची मुख्य प्रतोद पदी निवड केल्याने पश्चिम महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. रायगड जिल्ह्यातील अनिकेत तटकरे यांची प्रतोद पदी निवड केल्याने कोकणाला संधी मिळाली आहे तर एकनाथ खडसे यांची गटनेते पदी निवड झाल्याने उत्तर महाराष्ट्राचे संतलुन साधले आहे.