Naresh Mhaske : राज्यातील सरकारचा 31 डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील. 2024 मध्ये उद्धव ठाकरे हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री दिसतील असा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्याच्या याच दाव्यावर पलटवार करत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी राऊतांवर सडकून टीका केली. संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यामुळे त्यांनी असे खोटे दावे करू नयेत असे म्हस्के म्हणाले.
त्यांच्या आजच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट झालं आहे की जे काही चाललं आहे ते फक्त मुख्यमंत्रिपदासाठी चाललं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हे सगळं सुरू आहे. इतकच नाही तर संजय राऊत यांना स्वतःलाही मुख्यमंत्री व्हायचं होतं यासाठी त्यांनी आमदारांच्या बैठकाही घेतल्या होत्या असा दावा म्हस्के यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले याचं दुःख संजय राऊतांना आहे. हेच दुःख ते रोज सकाळी आरडाओरडा करून व्यक्त करत असतात. पण, थोडं थांबा एक दिवशी या सगळ्या गोष्टी बाहेर येतील असा इशाराही म्हस्के यांनी दिला.
Sanjay Raut: शिवसेना कोणाची हे पाकिस्तानला माहित पण.. संजय राऊतांची सडकून टीका
काय म्हणाले होते संजय राऊत ?
मुंब्रा हा ठाण्याचा आणि महाराष्ट्राचा भाग आहे. शिवसेना शाखेवर बुलडोजर फिरवायला कोणी सांगितले? उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि 2024 नंतर ते पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसणार आहेत हे विसरू नका. उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येण्यापासून रोखण्याचं कारस्थान पोलिसांनी रचलेलं आहे. कालपासून पोलिसांनी मुंब्रा आणि ठाणे ग्रामीण परिसरात दहशत पसरवलीय. उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स पोलिसांसमोर फाडण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या. तडीपार करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. पोलिसांची भूमिका उद्धव ठाकरे यांना अडवण्याची आहे. तर आम्हाला आडवून दाखवा, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं.