Udhdhav Thackeray On Devendra Fadanvis : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल नागपूर येथे भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हे नागपूरला लागलेले कलंक असल्याची टीका केली होती. यानंतर भाजपकडून त्यांना जोरदार उत्तर देण्यात आले. नागपूर येथे भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडले. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील पत्रकार परिषदेत कलंकित करंटा असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावर आता उद्धव ठाकरेंनी आता प्रत्युत्तर दिले आहे.
फडवीसांवरील टीका झोंबली! बावनकुळेंनी वाचला ठाकरेंच्या ‘कंलंकीत करंटेपणाचा’ पाढा
उद्धव ठाकरे म्हणाले की, “कलंक शब्द वापरला तर तळपायाची आग मस्तकाला जाण्याची गरज काय? तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करताना भ्रष्टाचाराचा कलंक नाही का लावत तुम्ही? हसन मुश्रीफांच्या पत्नीने रस्त्यावर उतरून आक्रोश केला होता. तेच हसन मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. मला आज कळलं यांनाही मांडी आहे. तेही दुसऱ्यांच्या मांडीला मांडी लावत आहेत. तुम्ही म्हणाल तर तो भ्रष्ट आहे, आणि मग त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान देता. तुम्ही म्हणाल तर तो भ्रष्ट, नाहीतर तो देव.”
तसेच एखादा माणूस भ्रष्ट आहे, असे म्हणून त्याच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा कलंक लावत नाही का? तुम्ही त्या कुटुंबावर आधी भ्रष्टाचाराचा आरोप करता. मग त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. यानंतर त्या कुटुंबाने समाजात वावरायचं कसं? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच आरोप करताना जनाचं नाही तर मनाच भान ठेवावं, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झालेल्या लोकमान्य टिळक पुरस्कारावरदेखील भाष्य केले. नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार शरद पवारांच्या उपस्थितीत प्रदान होणार आहे. ज्यांच्यावर तुम्ही 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, तो पक्ष तुमच्यासोबत आला. पवार साहेब तुमच्यासोबत व्यासपीठावर असणार,आमच्यातले मिंधे असणार, मग लोकांनी बघायचं काय? कोण कुणाला कलंक लावतंय? असा सवालही ठाकरेंनी विचारला.