पुणे : पुण्यातील विश्रांतवाडीतील आरटीओ कार्यालयातील जप्त केलेल्या वाहनांना आग लागल्याची घटना घडली. ऐन मकसंक्रातीच्या दिवशी वाहनांना आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडालीय. या आगीत तब्बल दहा वाहने जळून खाक झाली आहेत.
दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज मकरसंक्राती आणि रविवार असल्याने आरटीओ कार्यालयाला सुट्टी होती. ही आग नेमकी कशामुळे लागली, याची माहिती अद्याप मिळाली नसून आगीत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समजतंय.
आगीमध्ये चार कार, चार लक्झरी बस, एक टेम्पो तर एक डंपर अशी एकून दहा वाहनांनी पेट घेतला होता. आगीमध्ये हे सर्व वाहने जळून खाक झाली आहेत.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
दरम्यान, वाहनांना लागलेल्या या भीषण आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नसून आगीत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.