Download App

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरे रवाना

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोशी यांना काल रात्रीपासून अस्वस्थ वाटत होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. (Former chief minister of Maharashtra Manohar Joshi Admitted in Hinduja Hospital)

दरम्यान, जोशी यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे रुग्णालयात पोहचले आहेत. दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे अन्य मंत्री, आमदारही हिंदुजा रुग्णालयात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोण आहेत मनोहर जोशी?

मनोहर जोशी ८६ वर्षांचे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे सुरुवातीपासूनचे सहकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत ते पहिल्यांदा आमदार झाले होते. १९७६ ते १९७७ या काळात त्यांनी मुंबईचे महापौरपदही भूषवलं आहे. १९९५ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत येताच बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविली. त्यानंतर जोशी यांनी केंद्रीय मंत्री, लोकसभेचे सभापती अशा जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत.

मनोहर जोशी यांची वैयक्तिक माहिती :

मनोहर जोशी हे मूळचे बीडमधील पण त्यांचा जन्म झाला रायगडमध्ये. 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पुढे शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत आले आणि M.A. L.L.B झाले. या शिक्षणाच्या जोरावर त्यांना मुंबई महापालिकेत नोकरी मिळाली. पण नोकरीत त्यांचे मन लागत नव्हते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात उडी घेतली आणि विद्यार्थ्यांना व्यावयायिक प्रशिक्षण देणाऱ्या कोहिनूर इंस्टीट्यूटची स्थापना केली. यामुळेच त्यांना ‘गुरुजी’ म्हणूनही ओळखले जाते.

पुढे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आले, शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील नेते म्हणून त्यांच्याकडे आजही बघितले जाते. बाळासाहेबांच्या भाषणांनी आणि विचारांनी भारावून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष अशी एक एक चढत्या क्रमांकाची पद त्यांनी यशस्वीपणे भूषविली.

Tags

follow us