मुंबईत : जानेवारी रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या रॅलीमध्ये द्वेषपूर्ण आणि भडकावणारी भाषणे करुन खोटी माहिती व अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलीच कशी असा प्रश्न विचारत भडकाऊ भाषण देऊन समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.
हुसेन दलवाई यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या बॅनरखाली कार्यक्रम आयोजनामागे सकल हिंदू समाज आणि त्यांच्या घटक संघटना हे काम करीत असतात. मुंबईत दादरच्या मोर्चामध्ये तर महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि बाहेरुन आलेले कोणी आमदार यांनी देखील भाग घेऊन समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. समाजात इतका द्वेष पसरवणारे कार्यक्रम ताबडतोबीने रोखणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दलित, मुस्लिम, कुणबी आणि इतर निरनिराळ्या ओबीसी जाती यांना सामावून घेवून अतिशय आदर्श असे राज्य निर्माण केले, त्या शिवाजी महाराजांचे नाव घेऊन समाजात द्वेष पसरवल्यामुळे त्यांची देखील बदनामी केली जात आहे. हे सर्व दिसत असताना मुंबई पोलीसांनी मात्र मोर्चाला परवानगी दिली व बघाची भूमिका घेतली. महाराष्ट्राची परंपरा सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची आहे. त्या परंपरेला तडा जाणारी ही बाब असून यावर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे, असे दलवाई म्हणाले.