ips sudhakar pathare dead in road accident Telangana मुंबई : मुंबईत पोलिस उपायुक्त असलेले आयपीएस अधिकारी डॉ. सुधाकर भानुदास पठारे यांचे अपघाती निधन झाले आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून नागरकुरलूनकडे पठारे व त्यांचा नातेवाईक हे इनोव्हा कारने जात होते. बारा वाजण्याच्या सुमारात घाटात बस व कारची धडक झाली. त्यात सुधाकर पठारे व भागवत खोडके हे गंभीर जखमी झाले. रुग्णालयात आणण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला आहे. डॉ. सुधाकर पठारे हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळवणे (ता. पारनेर) येथील आहे. पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा पसरली आहे.
पठारे हे मुंबईत पोर्ट झोनचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. ते ट्रेनिंगसाठी हैदराबादला गेले होते. तेथून नातेवाईक भागवत खोडके यांच्यासह देवदर्शनाला जात होते. त्याचवेळी त्यांच्या बसला कार धडकून अपघात झाला. सुधाकर पठारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर भागवत खोडके यांच्या पायाला आणि अंतर्गत दुखापती झाल्या. दोघांनी सिट बेल्ट लावलेले नव्हते. खासगी रुग्णालयात पोहोचताच दोघांनाही मृत घोषित करण्यात आल्याची माहिती नगर कुरनूलचे पोलीस अधीक्षक वैभव गायकवाड यांनी दिली.
सुधाकर पठारे यांची अनेक शहरात सेवा
सुधाकर पठारे हे मूळचे पारनेर तालुक्यातील आहे. आयपीएस होण्यापूर्वी सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून त्यांनी नोकरी केलेली आहे. एमएस्सी, अॅग्री, एलएलबी असे त्यांचे शिक्षण झाले होते. 1995 साली ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. यानंतर विक्रीकर अधिकारी वर्ग एक म्हणून निवड झाली. 1998 साली ते पोलिस उपअधीक्षकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलुज, कोल्हापूर येथे सेवा बजावली आहे. तर सीआयडीचे अप्पर अधीक्षक म्हणून त्यांनी सेवा बजाविली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई या शहरात ते पोलिस उपायुक्त होते.