Kabutar Khana Dadar : मुंबईतील कबूतरखान्याचा वाद चांगलाच चिघळला (Kabutar Khana Dadar) आहे. आज मराठी एकीकरण समितीन कबूतरखाना बंदीच्या समर्थनासाठी आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी (Mumbai Police) दिली नव्हती. समितीला नोटीसा देण्यात आल्या होत्या. तरीदेखील समितीचे कार्यकर्ते आंदोलनस्थळी जमा होऊ लागले होते. त्यानंतर पोलिसांनीही आक्रमक होत आंदोलकांची धरपकड सुरू केली. यामुळे कबूतरखान्याचा वाद आता जास्तच चिघळल्याचे अधोरेखित झाले आहे. समितीने न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिसांकडून होत असलेल्या या कारवाईवर आंदोलकांनी संताप व्यक्त केला. कबूतरखाना बंदीचा विषय धार्मिक नाही. हा सामाजिक मुद्दा आहे. त्यामुळे या मुद्द्याला जातीय रंग देऊ नका. याआधी जैन समाजानेही आंदोलन केलं होतं मग त्या समाजाच्या आंदोलकांवर कारवाई केली का? असा सवाल आंदोलकांनी पोलिसांनी विचारला. पोलिसांच्या या कारवाईमुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
कबूतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीसांकडून हत्तीणी पाठोपाठ कबुतरांनाही अभय
दादर येथील कबूतरखाना कायमचा बंद झाला पाहिजे. कायदा न मानणारे, पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीने आजचे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे आंदोलन सुरू होताच पोलिसांनी धरपकड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आंदोलक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनावेळी या परिसरातील जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा यांना या आंदोलनाबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले. मला त्यावर काहीही बोलायचे नाही असे लोढा यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांनी कबूतरखाने बंद करण्याची घोषणा केली होती. यानंतर मुंबई महापालिकेने कबूतरखाने बंद करण्याची कार्यवाही सुरू केली. दादर येथील कबूतरखाना बंद केला. परंतु, या कबूतरखान्याचा वाद उफाळून आला. या ठिकाणी जैन धर्मियांनी मोठे आंदोलन झाले. कबूतरखाना खुला करण्याची मागणी केली. ताडपत्री फाडली. बांबू उखडून फेकले. त्यानंतर हा वाद न्यायालयात पोहोचला. या प्रकरणी 31 तारखेला पुन्हा सुनावणी होईल असे सांगत कबूतरखाने बंदच ठेवण्याचे आदेश दिले. यानंतर हा वाद थांबेल असे अपेक्षित होते. परंतु, तसे घडले नाही. कबूतरांना खाद्य टाकण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत.
ब्रेकिंग : हस्तक्षेप करता येणार नाही; मुंबईतील कबुतर खान्याबद्दल सुप्रीम कोर्टाचा जैन समाजाला दणका