पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघात (Kasba By Election) हळदी कूंकूचा कार्यक्रम पार पडला. कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीसाठी हेमंत रासने (Hemant Rasne) हे इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. सालाबादप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन चित्रा वाघ ( Chitra Wagh) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांकरिता हळदी कुंकू आणि तिळगुळ समारंभ असल्याने हजारो संख्येने महिलांनी यात सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित महिलांना भेटवस्तू म्हणून भाजप पक्षाचे चिन्ह आणि हेमंत रासने यांचा फोटो असलेल्या बॅग वाटण्यात आल्या आहेत. पोटनिवडणूक जाहीर झाली असताना अशा प्रकारचा कार्यक्रम घेणे हे आचारसंहितेचा भंग नाही का ? अशी चर्चा मात्र सर्वत्र होताना दिसत आहे.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. ती बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी सर्व पक्षांच्या शहराध्यक्षांची भेट घेऊन निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पत्र दिले आहे.
अखेर, निवडणूक झाल्यास संपूर्ण तयारीनिशी निवडणूक लढवली जाईल, असेही भाजप नेत्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. यासाठी बैठकांची सुरवात झाली आहे. महाविकास आघाडीचीही प्राथमिक बैठक झाली आहे. त्यातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी निवडणूक लढविण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.