श्रीकृष्ण औटी (विशेष प्रतिनिधी)
मुंबई : मुंबईत (Mumbai) सध्या मराठी विरुद्ध इतर हा वाद दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मुलुंडमधील एका महिलेने मराठी असल्याने आपल्याला ऑफिससाठी जागा मिळत नसल्याचा आरोप केला होता. सोबतच मराठी असल्याने आम्हाला योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप देखील आतापर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. मात्र, आता गिरगावातील मराठी बांधवांनी थेट स्थानिक आमदार व मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) हे मतांच्या राजकारणासाठी गिरगावातील (Girgaon) मराठी लोकांना डावलत असल्याचा आरोप केला आहे.
गिरगावातील रॉयल ऑपेरा हाऊस येथून सुरू होणाऱ्या आणि भारत पेट्रोलियम पंप येथे संपणाऱ्या मॅथ्यू मार्गचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिला होता. या मॅथ्यू मार्गाचे नाव बदलून ‘श्रीमत रामचंद्र मार्ग’ असे करण्यात यावे, असं आमदार लोढा यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. श्रीमद रामचंद्र हे जैन धर्मातील एक ऋषी असून त्यांचा मठ आणि त्यांच्या नावाने चालणारी एक ट्रस्ट गिरगावमध्ये आहे. मात्र, गिरगावात इतर देखील नामवंत व्यक्ती होऊन गेल्या आहेत. मग त्यामध्ये साहित्यिक, कलाकार, राजकारणी अशा सर्व क्षेत्रातील मराठी बांधव या गिरगावात होऊन गेले आहेत. त्यांची नाव न देता मंत्री लोढा यांनी केवळ मतांच्या राजकारणासाठी जैन धर्मगुरूंचे नाव या रस्त्याला दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मंत्री लोढा यांच्याकडून नाव बदलण्याचा प्रयत्न
या विरोधात आता गर्जतो मराठी या गिरगावातील संघटनेने आवाज उठवला. या रस्त्याला गिरगावातीलच एखाद्या साहित्यिक कलावंत किंवा राजकारणी व्यक्तीचे नाव देण्याची मागणी या संघटनेने केली आहे. यासंदर्भात या संघटनेचे पदाधिकारी चेतन मदन यांनी सांगितले की, आम्ही एक संस्था उभी केली आहे. तीही मराठी माणसासाठी. कारण, की मराठी माणसाच्या गिरगावात मराठीची अहवेलना होताना पाहायला मिळत आहे. मध्यंतरी मुलुंडचेही प्रकरण आपल्यासमोर आलं होतं. त्याची झळ आता गिरगावपर्यंत आली आहे. मॅथ्यू रोडचं नाव बदलत आहेत. स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांनी हे नाव बदलायचा प्रकार सुरू केला आहे. इथे स्थानिक नगरसेवक नाहीत. म्हणून लोढा स्वतःला नगरसेवकही समजतात.
कुठल्याही ठिकाणाला मराठी माणसाचचं नाव द्या
चेतन मदन म्हणाले की, सहाय्यक आयुक्त यांच्याकडे नामांतराचा प्रस्ताव आला आणि तो प्रस्ताव त्यांनी थेट आयुक्तांकडे दिला. आयुक्तांनी त्या प्रस्तावावर लगेच सही देखील केली. मंगल प्रभात लोढा यांच्याकडे जो प्रस्ताव देण्यात आला, त्यावर त्या ट्रस्ट मधून कोणाचीही सही नाही. कोणाचेही नाव नाही, असा प्रस्ताव तुमच्याकडे आल्यावर एका संस्थेचे हे पत्र महानगरपालिकेने ग्राह्य कसे धरलं? जर नामांतर करायच असेल तर आधीच जे नाव असतं ते विसर्जित कराव लागतं. तसा प्रस्ताव काढावा लागतो. पण, पालिकेकडून तशी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. जरी हा प्रस्ताव येत असला तरी आता आमची मागणी आहे की या गिरगावमध्ये कुठल्याही ठिकाणाला नाव द्यायचं असेल तर ते मराठी माणसाचचं द्यावं. इथे मोठे मराठी कलावंत नाहीये का? गिरगावात किती मराठी कलावंत घडवले आहेत. कलावंतांची नावे द्यायला का त्यांना आठवलं नाही? कलावंतांची नावे दिली असती तर आम्ही त्यांच अभिनंदन आणि सत्कार केला असता.
जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात चकमक, २ जवान शहीद, लष्कराची शोध मोहिम तीव्र
अन्यथा जाहीर आंदोलन
मराठीला बाजूला करायचं आणि आपली नाव द्यायची आणि स्वतःची राजकीय पोळी भाजायची. तिथे झोपडपट्ट्या होत्या, दुकान होती, त्याच्यावर कोणतीही नोटीस न देता कारवाई करण्यात आली. त्यांचं पुनर्वसन अद्याप करण्यात आलेलं नाही. स्वतःच्या मंत्री पदाच्या जोरावर कौशल्य दाखवत मंगल प्रभात लोढा यांनी हा नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. जर इकडे मराठी माणसांचे नाव दिले नाही तर आमच्याकडून जाहीर आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल, याची आयुक्तांनी देखील नोंद घ्यावी. या रस्त्याला श्रीमद रामचंद्र यांचे नाव देण्यात येत आहे. इथे त्यांचे वास्तव्य होत असे सांगण्यात आलेले आहे. तर मग पालिकेने रामचंद्र यांच्या वास्तव्याचे पुरावे द्यावेत. ज्या व्यक्तीचे इथे नाव देण्यात येत आहे. तसे काही स्थानिक पुरावे आहेत का? ते द्यावेत. तसेच त्या व्यक्तीचा गिरगावकरिता काही योगदान आहे का? हेही सांगावं, असंही चेतन मदन म्हणाले.