Mumbai Crime: मुंबईतील (Mumbai Crime) चेंबूर येथील गोवंडी परिसरात एका १३ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका ४० वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाला (Cricket coach) अटक करण्यात आली आहे. हा संतापजनक प्रकार देवनार पोलीस (Deonar Police)ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका महानगरपालिकेच्या मैदानावर घडला. या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे
आयएनएस या वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरकोपरमधील पंतनगर येथील रहिवासी असून ती गोवंडी परिसरातील एका मैदानावर असलेल्या क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होती. त्या अकादमीमध्ये क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी प्रशिक्षकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजेंद्र पवार (वय ४१ वर्षे) असून तो गोवडी येथील रहिवासी आहे.
कॅन्सरवरील लस उपलब्ध करून देण्याच्या महायुती सरकार विचाराधीन; अदिती तटकरे
आरोपीने दिली होती धमकी…
प्राथमिक माहितीनुसार, वारंवार अत्याचार करून आरोपीने पीडितेला घटनेबद्दल कुठेही काहीही न सांगण्याची धमकी दिली होती. त्यामुळं पीडित मुलगी गप्प राहिली होती. मात्र, आपल्या मुलीच्या वागण्यातील बदल पाहून पालकांना संशय आला. पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पालकांनी पंतनगर पोलिसात धाव घेत फिर्याद नोंदवली.
ही घटना देवनार परिसरात घडली असल्याने, तपास देवनार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
दरम्यान, या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन देवनार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपी हा माजी रणजी खेळाडू असल्याची माहिती आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.