नवी मुंबई : आपल्या सहकाऱ्यांच्या मनात नाराजी निर्माण होऊ नये याची काळजी घेण्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. आमदार बच्चू कडुंची (Bachchu Kadu) काही नाराजी असेल तर ती दूर करण्याचे काम सहजपणे होईल, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माध्यमांशी बोलताना केले.
अनिल परब (Anil Parab) यांच्यावरील कारवाई संदर्भात विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, आमदार अनिल परब कार्यालयावरील कारवाईही नियमाने होत आहे. त्यावर मला भाष्य करायचे नाही. राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे त्या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे जास्त चर्चा व्हावी.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे. विद्यार्थ्यांचा असंतोष लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तो अभ्यासक्रम असावा असे शासनाकडून एमपीएससीकडे मागणी करण्यात येईल. विद्यार्थ्याचा विरोध हा अभ्यासक्रमाला नाही तर अभ्यासक्रमातील बदल हे केव्हापासून लागू करावे याबाबत आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या पराक्रमाचे वर्णन करणारे मुळ गीत चार कडव्याचे होते. त्यापैकी दोन कडवे निवडत त्याला राज्यगीताचा दर्जा देण्याचा प्रस्ताव झाला. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रगीतनंतर राज्यगीत हे सुध्दा तिथे सन्मान पुर्वक म्हटंल जाईल, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
यासंदर्भात काही नियम करण्यात आले आहेत. विधानसभेचे सत्र सुरु होईल त्यावेळी वंदे मातरम् नंतर राज्यगीत म्हणावं अशी विनंती आम्ही विधानभवन कार्यालयाला आणि सभापती यांना करणार आहोत, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.