Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने (Akshay Shinde Encounter) पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. तर अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला.
जीपमधून प्रवास करत असताना अक्षयने पोलिसांच रिव्हॉल्व्हर हिसकावले आणि पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. याशिवाय, गोळीबारात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. बदलापूरच्या शाळेतील दोन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती.
Badlapur Encounter : आमच्या पोराला पैसे घेऊनच मारून टाकले; अक्षय शिंदेंच्या आईवडिलांचा आरोप
या चकमकीत ज्यांच्या गोळीने आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला, त्या पोलीस अधिकाऱ्याने एन्काउंटर फेम अधिकारी प्रदीप शर्मांबरोबर काम केले होते अशी माहिती आता समोर आली आहे. ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी गोळी आरोपी अक्षय शिंदेवर गोळी झाडल्याची माहिती आहे. संजय शिंदे यांचा इतिहासही रंजक आहे. त्यांनी गुन्हे शाखेच्या अँटी एक्सटॉर्शन विभागात काम केलं आहे. 1983 मध्ये पोलीस दलात ते रुजू झाले होते. त्यांनी काही काळ चकमकफेम प्रदीप शर्मा यांच्या बरोबरही काम केले होते.
गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकात संजय शिंदे यांचाही समावेश होता. तसेच बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी पथकात संजय शिंदे यांचा समावेश होता.