Download App

रस्त्यावरची लढाई कोर्टात! हिंदी भाषिकांना मारहाणप्रकरणी ठाकरेंविरुद्ध ‘सुप्रीम’मध्ये याचिका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे.

Hindi Marathi Language Row : राज्यात आणि विशेषतः मुंबईत सध्या मराठी भाषेचा (Marathi Language) मुद्दा तापला आहे. मराठी येत नाही म्हणून हिंदी भाषकांना मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. यात राज ठाकरे यांचा (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीवर आहे. आता रस्त्यावरची ही लढाई आता कोर्टात पोहोचली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे. हिंदी भाषिकांविरुद्ध हिंसाचाराला खतपाणी घालण्यासह द्वेष पसरवण्यात आला असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी विनंंतीही करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील हिंदी भाषिकांना मारहाणीच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मीरा भायंदर येथील एका व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी मराठी भाषेचा अपमान केला म्हणून मारहाण केली होती. यानंतर हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे बंधुंनीही प्रतिमोर्चा काढला होता.

त्यांचं राजकारण कचराकुंडीत गेलं; सोबत जाणारा समाप्त होईल, राज ठाकरेंना भाजप खासदारने डिवचलं

तेव्हापासून हा मुद्दा दिवसेंदिवस अधिक उग्र होत चालला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या हिंदी भाषिक व्यापाऱ्यांच्यावतीने वकील घनश्याम उपाध्याय यांनी याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांच्या माध्यमातून हिंदी भाषिकांविरुद्ध हिंसाचार भडकावण्याचा आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. हिंदीचा विरोध म्हणून मराठी भाषा बोलता न येणाऱ्या आणि परराज्यांतून आलेल्या लोकांवर मराठी लादली जात आहे. त्यामुळे तणाव, हिंसाचार आणि द्वेषासाठी जबाबदार धरून राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

राज ठाकरेंचा इशारा काय?

कानावर मराठी समजणार नसेल तर कानाखाली बसणारच असा इशारा राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मीरा रोड येथे झालेल्या जाहीर सभेतून दिला होता. पुढे बोलताना ते म्हणाले होते की,  साधा छोटा प्रसंग होता. मोर्चाला जमलेले महाराष्ट्र सैनिक पाणी प्यायला गेले होते, त्या माणसाने विचारलं कशासाठी मोर्चा काढता, मनसे सैनिकांनी सांगितलं की, हिंदी सक्तीविरोधात मोर्चा सुरू आहे, त्यानंतर तो म्हणाला की इथे हिंदीच बोलतात.  त्या माणसाच्या अरेरावीमुळे त्याच्या कानफटात बसली. मग व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. तुमच्या कानाखाली मारली होती का? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

अजून नाही मारली, विषय समजून न घेता, काय झालं माहीत नसताना कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन बंद पुकारता, तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाही का इथे? दुकानं बंद करून किती दिवस राहणार? आम्ही काही घेतलं तर दुकानं सुरू राहतील, महाराष्ट्रात राहाताय शांतपणे राहा, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं होतं.

Video : हिंदीवरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक; सरदार पटेल अन् मोरारजी देसाईंचं नाव घेत वाचला इतिहास

follow us