Download App

Mumbai : विधानसभेत शरद पवारांचा एकेरी उल्लेख, राष्ट्रवादीच्या आमदारांचा गदारोळ

मुंबई  :  राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये आज भाजप आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. यावरुन विधानसभेत जोरदार हंगामा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सातपुते यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. यानंतर सातपुते यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदार राम सातपुते यांना उद्देशून भाषण केले होते. यावर बोलताना राम सातपुते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणामुळे मी विधानसभेत निवडून आलो, तुमच्या शरद पवारामुळे नाही आलो. या त्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जोरदार आक्रमक झाले आहेत.  राम सातपुते यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

यानंतर राम सातपुते यांनी स्पष्टीकरण देते माफी मागितली आहे. आव्हाड यांनी माझ्याकडे हात करुन तुम्ही आरक्षणामुळे आमदार झालात असे म्हणत माझा तुच्छतेने उल्लेख केला. तरी माझा कोणत्याही नेत्याच्या भावना दुखवण्याचा उल्लेख नव्हता. माझ्याकडून चुकून उल्लेख झाला असेल तर मी माफी मागतो, असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार देखील आक्रमक झाले होते. अशा प्रकारे एका वरीष्ठ नेत्याविषयी सभागृहात एकेरी उल्लेख करुन बोलणे योग्य नाही. नाही तर कोणीही अशा प्रकारे वरीष्ठ नेत्याचा उल्लेख करील, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी व्यक्त केली आहे.

Tags

follow us