विधानपरिषदेला पानसरेंना साथ देणे नडले ? बाळासाहेब नाहाटांना राज्य बाजार संघाच्या सभापतीपदावरून हटविले

Balasaheb Nahata -महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या सभापतिपदावरून नाहाटा यांना हटविण्यासाठी संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता.

Balasheb Nahata

Balasheb Nahata

Balasaheb Nahata : श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब नाहाटा (Balasaheb Nahata) यांना मोठा राजकीय धक्का बसलाय. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या (Maharashtra State Market Committees Cooperative Federation) सभापतीपदावरून त्यांना पायउतार व्हावे लागले आहे. नाहाटा यांच्याविरोधात आणलेला अविश्वास ठराव 17 विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला आहे. दत्तात्रेय पानसरे यांच्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील आणखी एका नेत्याला राज्यस्तरीय पदावरून पायउतार व्हावे लागल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या सभापतिपदावरून नाहाटा यांना हटविण्यासाठी संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर निर्णय घेण्यासाठी काल संघाच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत ठरावाच्या बाजूने सर्व उपस्थित संचालकांनी मतदान केल्याने नाहाटा यांना सभापतिपद गमवावे लागले आहे.

17 संचालकांचे ठरावाच्या बाजूने मतदान
संघाच्या 21 संचालकांपैकी 17 संचालक बैठकीला उपस्थित होते. नाहाटा यांच्यासह संदीप काळे, बाबा पाटील आणि मनीष दळवी हे चार संचालक अनुपस्थित होते. संचालक अंकुश आहेर यांनी अविश्वास ठराव मांडला, तर पोपटराव सोनवणे यांनी त्यास अनुमोदन दिले. उपस्थित सर्व 17 संचालकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे 17 विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. दरम्यान एका प्रकरणात आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात नाहाटा अटकेत आहेत. या पार्श्वभूमीवर संचालकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला आहे.

पानसरेंनंतर नाहाटांनाही धक्का
श्रीगोंदा तालुक्यातील दत्तात्रेय पानसरे आणि बाळासाहेब नाहटा ही जोडी राजकीयदृष्ट्या प्रभावशाली मानली जाते. दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात कार्यरत आहेत. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीगोंदा तालुक्याला राज्यस्तरावर नेतृत्व करण्याची संधी देत या दोन्ही नेत्यांना महत्त्वाची पदे दिली होती. मात्र, विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी पानसरे यांनी घेतलेली भूमिका त्यांना नडल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर होऊन त्यांना राज्य पणन महासंघाचे पद गमवावे लागले होते. आता त्यांच्यापाठोपाठ नाहटा यांच्याविरोधातही अविश्वास ठराव मंजूर झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

विधानपरिषद निवडणुकीत पानसरे यांना साथ दिल्यामुळे नाहाटा यांच्याविरोधातही अविश्वास ठराव आणला गेला का, अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र, या राजकीय चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे नाहाटा यांच्याविरोधातील कारवाईमागे नेमकी कोणती राजकीय समीकरणे आहेत, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. श्रीगोंदा तालुक्याला राज्यस्तरावर मिळालेल्या नेतृत्वाच्या संधींपैकी दोन महत्त्वाची पदे अल्पावधीत गेल्याने स्थानिक राजकारणात या घडामोडींचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. बाजार समिती संघाच्या नव्या नेतृत्वाची निवड आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुढील राजकीय हालचालींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version