मुंबईः शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत हे पुन्हा अडचणीत आले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा यांनी मानहानीच्या दाखल केलेल्या दाव्यात राऊतांविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आले आहे.
मुंबईच्या शिवडी न्यायालयाने हे वारंट जारी केले आहे. पुढील सुनावणी २४ जानेवारीला ठेवण्यात आली आहे. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याच्या सुनावणीसाठी राऊत यांना हजर राहायचे आदेश न्यायालयाचे होते. त्यानंतरही राऊत न्यायालयात हजर राहिले नाहीत.
संजय राऊत यांनी निराधार आणि अपमानजनक आरोप लावले आहेत. मुंबईतील मीरा भाईंदर परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या शंभर कोटी रुपयांचा घोटाळ्यात माझ्या पतीचा सहभाग असल्याचे राऊत यांनी आरोप केला, असा दावा मेधा सोमय्या यांनी दाखल केलेला आहे.
मानहानीच्या खटल्यात संजय राऊत हे सुनावणीदरम्यान सतत गैरहजर होते. त्यामुळे त्याच्याविरोधात वॉरंट जारी करण्याची मागणी करण्यात आली होती. शुक्रवारी न्यायालयाने मेधा सोमय्या यांचे सुमारे तासभर जबाब नोंदवले. त्यानंतर न्यायालयाने राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले.