मुंबई : मुंबईतील दादर परिसरांत लव जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबईतील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला असून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसह शिंदे गटाच्या नेत्यांनी या मोर्चात सहभागी झाले आहेत.
शिवाजी पार्कमधून सुरुवात झालेल्या या मोर्चामध्ये लव जिहादविरोधी आणि धर्मांतराविरोधी कायदा पारित करण्यात यावा, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आलीय. या मोर्चाला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ, आमदार नितेश राणे, आशिष शेलार, प्रविण दरेकर, किरीट सोमय्या यांच्यासह किरण पावस्कर उपस्थित होते. या मोर्चाला भाजप-शिंदे गटाकडून पाठिंबा देण्यात आला आहे.
या मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला असून या मोर्चाचं नेतृत्व महिलांकडूनच करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मोर्चाच्या व्यासपीठावर अनेक महिलांनी भाषणे केली आहेत. यावेळी तत्कालीन सरकारमध्ये लव जिहाद वाढल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर दुसरीकडे मोर्चामध्ये नागरिकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत लव्ह जिहाद विरोधी कायदा संमत करण्याची प्रमुख मागणी केलीय.
यावेळी नागरिकांनी लव्ह जिहाद प्रेम नाही, षडयंत्र आहे, हिंदू मुलींना वाचविणे आपले कर्तव्य आहे, अशा मजकुराचे फलक हाती घेतले होते. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला होता. मोर्चामध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने बाईक रॅली देखील काढण्यात आली होती.
श्रध्दा वालकर हत्याकांडानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढून लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची मागणी केली करण्यात येत आहे. हीच प्रमुख मागणी आजच्या मुंबईतील मोर्चामध्ये करण्यात आलीय.
दरम्यान, थोड्याच वेळापूर्वीच हा मोर्चा संपल्याचं जाहीर करण्यात आलं असून शिवाजी पार्कमधून निघालेला या मोर्चाची सांगता कामगार मैदानात झाली आहे. मोर्चादरम्यान, कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.